102 जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे थाटात वितरण
नांदेड, दि.16: विवाह नोंदणी प्रमाणपत्राबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करुन त्यांना सहभागी करण्याचा वासवी क्लबचा उपक्रम स्तुत्य असून महापालिकेनेही असे उपक्रम घेणा-या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व वैद्यकीय शिक्षण, तंत्रशिक्षण, अपारंपारिक उर्जा व विशेष सहाय राज्यमंत्री तसेच नांदेडचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी शुक्रवारी (दि.15) केले.
महापालिका व वासवी क्लबच्या संयुक्त विद्यमाने मनपा क्षेत्रातील सहाही क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विवाह नोंदणी केलेल्या 102 जोडप्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महापौर अ. सत्तार अ. गफ़ूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी धीरजकुमार, आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, नगरसेवक दिलीप कंदकुर्ते, वासवी क्लबचे गव्हर्नर डॉ. नरेश रायेवार, व्याख्याते राऊत सर, उपायुक्त राजेंद्र खंदारे, विद्या गायकवाड, व्यंकटेश जिंदम, व्यंकट मुदीराज, वासवी क्लबचे अध्यक्ष रितेश व्यवहारे, सचिव प्रशांत चालिकवार, कोषाध्यक्ष संदीप नांदेडकर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमत्री सावंत म्हणाले, शासनाच्या सर्व योजना जनतेशी अर्थात समाजाशी निगडीत असतात, त्याकरिता त्याचा प्रसार करणे ही केवळ सरकारची नव्हे तर स्वयंसेवी संस्थांचीदेखील सामाजिक जबाबदारी आहे. मी लॉयन्स क्लबचा अध्यक्ष असताना यासारखे काही उपक्रम राबवल्यानंतर मला लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. महापालिकेने ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम सुरु केल्याबद्दल अभिनंदन करुन त्यांनी कार्यक्रमात प्रमाणपत्र मिळविणा-या जोडप्यांचे अभिनंदन केले. या प्रमाणपत्रामुळे तुम्ही आज कायदेशीर पती-पत्नी झाला आहात. या प्रमाणपत्राची खूप आवश्यकता भासेल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, की कुटुंबात वावरताना विवाह ही सामाजिक जबाबदारी असते. आयुष्यातील महत्वाच्या एका संस्काराला कायदेशीर स्वरुप देण्याचा वासवी क्लबचा उपक्रम इतरांसाठी अनुकरनीय आहे. मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात महापालिकेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरणास 2008 पासून सुरुवात झाल्याचे सांगून आजपर्यंत दोन हजार 300 दांम्पत्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे नमूद केले. प्रशांत चालिकवार यांनी प्रास्ताविक हा उपक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली. रितेश व्यवहारे यांनी वासवी क्लबच्या उपक्रमाची माहिती दिली. दुपारच्या सत्रात गटनेते सय्यद शेरअली, अख्तर हुसेन यांच्या हस्तेदेखील प्रमाणपत्राचे वितरण झाले. शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती इतरत फ़ातेमा यांनी कार्यक्रमास भेट देऊन सर्व दाम्पंत्यांना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचलन विजय बंडेवार यांनी केले. संदीप नांदेडकर यांनी आभार मानले, कार्यक्रमास सहायक आयुक्त एस. टी. मोरे, डॉ. विजयकुमार मुंडे, सुधीर इंगोले, जगदीश कुलकर्णी, मनपाचे उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा फ़रतुल्ला बेग, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे यांच्यासह महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयातील विवाह नोंदणी व संगणक कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment