- जिल्हाधिका-यांच्या महापालिकेला सूचना
- पिण्याच्या 3.76 दलघमी पाण्याचा अवैध उपसा उघडकीस
नांदेड: विष्णुपुरी जलाशयातील पिण्यासाठी आरक्षित
असलेल्या साठ्यापैकी 3.76 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचा सिंचनासाठी अनाधिकृतपणे
उपसा झाल्याची बाब मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी निदर्शनास आणून
दिल्यानंतर अनाधिकृत उपसा तात्काळ बंद करुन त्यावर नियंत्रणासाठी दक्षता पथक
स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी सर्व संबधित यंत्रणेला केल्या आहेत.
नांदेड शहराच्या
पाणीपुरवठ्यासाठी एकमेव स्त्रोत असलेल्या विष्णुपुरी जलाशयातील पाणी हे फ़क्त
पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. सध्यस्थितीत अत्यंत कमी म्हणजे केवळ 17.09
टक्के इतकेच पर्जन्यमान झाले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासंबधी
शासनाने मागील महिन्यातच सर्व प्रकारच्या शासकीय स्त्रोतातील पाणी पिण्यासाठी
आरक्षित करुन सर्व प्रकारच्या पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले
होते.
विद्यमान आणि संभाव्य टंचाईची वाढती तीव्रता लक्षात
घेता दि. 27 जुलै 2014 रोजी दिग्रस बंधा-यातील 8.68 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्याच्या
वापरासाठी विष्णुपुरी जलाशयात सोडण्यात आले आहे. परंतु पिण्यासाठी आरक्षित
केलेल्या साठ्यापैकी 3.76 दशलक्ष घनमीटर पाण्याचा अनाधिकृतपणे सिंचनासाठी उपसा केल्याचे
उघडकीस आल्याची बाब मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी दि. 4 ऑगस्ट 2014
रोजी एका पत्राद्वारे जिल्हाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची गंभीर
दखल घेऊन नांदेडचे पोलिस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे
विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता
आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना एका लेखी पत्राद्वारे विष्णुपुरी
जलाशयातील अनाधिकृत उपसा रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलून कारवाई करण्याच्या सूचना
जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी दक्षता पथक गठित करुन
अनाधिकृत पाणी उपशावर नियंत्रण ठेवावे, असेही या पत्रात कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment