Tuesday, July 29, 2014

पंढरपूरच्या समितीकडून नांदेड विकासाची पाहणी


नांदेड, दि.28: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या नियोजनासाठी नांदेडमध्ये दाखल झालेल्या पंढरपुर देवस्थान विकास प्राधिकरण समितीच्या पथकाने मंगळवारी (दि.29) नांदेड शहरातील विविध विकास प्रकल्पाची पाहणी केली.

पथकाने नदीघाट विकास आणि सुशोभिकरण, अम्पी थियटर, अबचलनगर पुनर्वसित प्रकल्प, बोंढार येथील मलशुध्दीकरण केंद्र, श्रावस्तीनगर येथे विस्थापित कुटुंबांना बीएसयुपी प्रकल्पात बहुमजली इमारत बांधून केलेले त्यांचे पुनर्वसन, गोविंद बाग अशा विविध कामांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, उपअभियंता प्रकाश कांबळे, आयएलएफ़एसचे नरेश वर्मा, वाय. एन. कदम, शारदा कन्स्ट्रक्शनचे चौधरी यांनी विविध प्रकल्पाची माहिती दिली.

पंढरपूरमध्ये प्रत्येक एकादशीला येणारे हजारो भाविक आणि आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला येणा-या लाखो भाविकांना तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी केलेल्या सूचनेनुसार ही समिती देशात हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि नांदेड या चार शहराला भेटी देणार आहे. पंढरपुर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने 512 कोटी रुपयांचा निधी दिला असून जसजशी गरज भासेल तसतसा आणखी निधी मिळणार असल्याचे पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोरे, सोलापूरच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक पाटील, सल्लागार शरद मोहिते यांच्या समितीने प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर प्रत्येक कामाबद्दल कौतुक केले. अत्यंत कमी वेळेत प्रशासनाला कौशल्यपुर्वक कामे करता आली. राज्य आणि केंद्र सरकार पाठीशी असणे, विकासकामात नागरिकांचा सहभाग, राजकीय इच्छा शक्ती आणि प्रशासकीय गतिमानता अशा सर्व बाबी एकदाच जुळून आल्यामुळे नांदेड मध्ये अद्वितीय विकासकामे होऊ शकली, असा अभिप्राय समितीने यावेळी नोंदवला.

Monday, July 28, 2014

पंढरपूरच्या पथकाची नांदेड महापालिकेस भेट


नांदेड, दि.28: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या नियोजनासाठी पंढरपूर देवस्थान विकास प्राधिकरण समितीच्या पथकाने सोमवारी (दि.28) नांदेड महापालिकेस भेट देऊन गुरु ता गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त आणि जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेतंर्गत केलेल्या कामांच्या नियोजनाची माहिती घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने पंढरपूर संस्थानच्य प्रमुखपदी सरकारचा प्रतिनिधी नेमला असल्याने तेथील बडव्यांचा हस्तक्षेप आता बंद झाला आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीनिमित्त तेथील विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या असल्याने तीर्थक्षेत्र विकासाची पार्श्वभूमी असलेली शहरे कशी विकसीत झाली आणि सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने दाखल होणा-या भाविकांना सर्व सुविधा कोणत्या पध्दतीने पुरविल्या जातात, याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नांदेडमध्ये दाखल झाली आहे.
पंढरपूरमध्ये प्रत्येक एकादशीला येणारे हजारो भाविक आणि आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला येणा-या लाखो भाविकांना तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करावयाचा असल्याने सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी केलेल्या सूचनेनुसार ही समिती देशात हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि नांदेड या चार शहराला भेटी देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समितीने सोमवारी दुपारी सचखंड गुरुद्वारा येथे मत्था टेकून त्या परिसरातील विकासकामांची पाहणी केली. उद्या मंगळवारी (दि.29) ही समिती शहरातील विविध प्रकल्प तसेच विकासकामांची पाहणी करणार आहे.

सदर पथकात पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोरे, सोलापूरच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक पाटील, सल्लागार शरद मोहिते यांचा समावेश आहे. उपायुक्त (विकास) रत्नाकर वाघमारे यांनी सादरीकरणाद्वारे 2008 पुर्वीचे आणि नियोजनबध्द पध्दतीने नंतर कायापालट झालेले नांदेड याची सचित्र आणि गुगल नकाशाद्वारे माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रभारी आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, उपायुक्त राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, नायब तहसीलदार बंग, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, आयएलएफ़एसचे डी. के. सिंग, नरेंद्र वर्मा आदी उपस्थित होते. 

महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात 18 अनाधिकृत होर्डिंग हटवले


नांदेड, दि.28: शहरातील विविध भागात विनापरवाना आणि अनाधिकृतपणे लावण्यात आलेले 18 होर्डिंग सोमवारी (दि.28) मनपा क्षेत्रिय अधिका-यांच्या पथकाने काढून टाकले. शिवाजीनगर येथील काही लोकांनी होर्डींग काढण्यास आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे सांगितल्यानंतर लोक शांत झाले आणि त्यांनी होर्डींग हटवण्याच्या कामात बाधा येऊ दिली नाही.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाने आज सोमवारी (दि.28) अचानकपणे ही मोहिम राबवली. मुंबई उच्च न्यायालयाने दि. 21 फ़ेब्रुवारी 2014 रोजी दिलेल्या निर्देशानुसार विनापरवानगी व अनाधिकृतपणे असलेले होर्डिंग काढून घेण्याची कारवाई यापुर्वीदेखील करण्यात आली असून काही प्रकरणात गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. शहराचे सौदर्य अबाधित ठेवून बेकायदेशीर होर्डिंगवर प्रतिबंध करण्याचे आदेश यापुर्वीच निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी केलेल्या सूचनेनुसार उपायुक्त रत्नाकर वाघमारे व राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त अविनाश अटकोरे, शिवाजी डहाळे, गणेशराव आडेराघो, सुधीर इंगोले, एस. टी. मोरे, मोहन डिंकाळे, नियंत्रक गणेश शिंगे, सहायक पोलिस निरिक्षक भराडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयातील कर निरिक्षक व पोलिस पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच सार्वजनिक मालमत्तेवर लावलेले 18 होर्डीग सोमवारी काढून टाकले. यामध्ये शिवाजीनगर झोन (4), अशोकनगर झोन(5), इतवारा झोन (3), वजिराबाद झोन (4) तर तरोडा झोनच्या 2 होर्डींगचा समावेश आहे. महापालिकेचे पथक होर्डिंग हटवत असल्याचे कळताच अनेकांनी लगेच आपले होर्डिंग काढून घेतले.
परवानगीशिवाय होर्डिंग नको: डॉ. देशपांडे

ज्यांना शहरात होर्डींग लावायचे आहेत, त्यांनी महापालिकेची रितसर परवानगी घेऊन दिलेल्या मुदतीतच होर्डिंग लावावे. जाहिरातीसाठी महापालिकेने काही कायम स्थळे निश्चित करुन अभिकर्त्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून परवानगी घेऊनच आपले होर्डिंग लावावेत. वाहतूक व रहदारीला अडथळा होणार नाही, अशा खाजगी जागेवर होर्डिंगला शक्य तितक्या लवकर तात्पुरती परवानगी देण्यात येईल. परंतु परवानगी असल्याशिवाय कोणीही दृष्टीगोचर होर्डिंग लावून सार्वजनिक मालमत्ता विरुपन कायद्याचा भंग करु नये तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी केले आहे.  

Friday, July 25, 2014

क्रीडा धोरणात शहरी भागाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करु : पालकमंत्री


श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमच्या विकासकामाचे भूमिपुजन
नांदेड, दि. 25: राज्याच्या क्रीडा धोरणात ग्रामीणप्रमाणे शहरी भागाचाही समावेश करण्यासाठी आपण शासनाकडे आग्रह धरुन त्यात नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमच्या विकासाला चालना देण्यासाठी कटीबध्द राहू, अशी ग्वाही पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी शुक्रवारी (दि.25) दिली.
महापालिकेच्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम विकासाचे भुमिपुजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी धीरजकुमार, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे,  प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे,  सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, गटनेते सय्यद शेरअली, माजी अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, कॉग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक दिलीप कंदकुर्ते, विजय येवणकर, नवल पोकर्णा, प्रभागाच्या नगरसेविका कमलाबाई मुदिराज, क्रिकेट संघटनेचे अशोक तेरकर, नंदकुमार मेगदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, की जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने स्टेडियम विकासाचे हे काम मार्गी लागत आहे. सदर काम दर्जेदार आणि वेळेत पुर्ण करावे, अशी सूचना त्यांनी केली. स्टेडियम विकासाच्या पुढच्या ट्प्प्य्यात रात्रीदेखील सामने खेळण्याची व्य्वस्था निर्माण करण्याची तयारी ठेवावी. त्याचबरोबर क्रिकेट खेळाच्या दर्जेदार मैदानाची उपलब्धता लक्षात घेऊन नांदेडमध्ये क्रिकेट ऍकडमी सुरु करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रभारी आयुक्त डॉ. देशपांडे देशात महाराष्ट्र या एकमेव राज्यात क्रिडा धोरण निश्चित झाल्याचे सांगून त्यात शहरी भागाचा समावेश करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यावर पालकमंत्र्यांनी या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्याची ग्वाही दिली.
माजी मनपा आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, की माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्टेडियममधील कार्यालये हलवून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान निर्माण करण्याची सूचना आम्हाला केली होती. त्यामुळे माझाही उत्साह वाढला. नांदेडमध्ये यापुर्वी रणजी सामने झाले. पण आताच्या मैदानाची अवस्था क्रिकेट खेळण्यायोग्य नाही. क्रिकेट हा जगातील केवळ लोकप्रिय खेळच नव्हे तर जेथे क्रिकेटचे सामने होतात,  त्या भागाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण होते. नांदेडमधील सुनील जाधव,  सुनील यादव, काजी शमाशुजमा उर्फ़ टिपू या तीन खेळाडूंची रणजी सामन्यासाठी निवड झाली, परंतु शहरात सरावाची व्यवस्था नसल्याने त्यांना इतर ठिकाणी जाऊन खेळावे लागले आहे. अशा मैदानातूनही मनपास वर्षाकाठी आज आठ लाख रुपये मिळतात. दर्जा सुधारला तर हे उत्पन्न 20 लाखापर्यंत जाईल. स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे विकास आणि शहरात ज्येष्ठ नागरिक भवन या सत्ताधारी पक्षाच्या जाहीरनाम्यातील असलेले विषयांना मार्गी लावले आहे.
उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सूत्रसंचलन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपायुक्त राजेंद्र खंदारे, सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे, उप अभियंता दिलीप टाकळीकर, शिवाजी बाबरे, सहायक आयुक्त गणेशराव आडेराघो, शिवाजी डहाळे, उद्यान अधिक्षक मिर्झा बेग आदी उपस्थित होते.


रामाप्रमाणे परत या, भरतासारखी वाट पाहिन



जी. श्रीकांत यांच्या निरोप समारंभात जिल्हाधिकारीही गहिवरले
नांदेड, दि.25: जी. श्रीकांत यांच्या साडेअकरा वर्षाच्या प्रवासात नांदेडशी भावनिक नाते जोडल्या गेले आहे. त्यांनी पुन्हा संधी मिळाली तर नांदेडला येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शासकीय सेवेत ते माझ्यापेक्षा कनिष्ठ असले तरी काम करण्यात माझ्यापेक्षा अधिक धाडसी आहेत. एक दीड वर्ष घालवून त्यांनी नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रामाप्रमाणे परत यावे, मी भरतासारखी त्यांची वाट पाहिन, अशा शब्दात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी गुरुवारी (दि.24) मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या निरोप समारंभात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित या सोहळ्याला गौरव समारंभाचे स्वरुप प्राप्त झाले होते. याप्रसंगी महापौर अब्दुल सत्तार, पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया,  सहायक जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, सहायक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जी. श्रीकांत यांचे वडील नरसप्पा सज्जन, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे,  विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, गटनेते सय्यद शेरअली, प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे,  नगरसेवक विनय पाटील-गिरडे, विनय गुर्रम, नगरसेविका अनुजा तेहरा, ललिता बोकारे, स्नेहा पांढरे, माजी महापौर सुधाकर पांढरे, माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात महापालिकेतून बदली झालेले अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, सहायक आयुक्त वसुधा फ़ड, लेखाधिकारी तु. ल. भिसे, उप अभियंता ढवळे यांनाही निरोप देण्यात आला. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, तिकीट कलेक्टर ते आयुक्त असा साडेअकरा वर्षाचा प्रवास एकट्या नांदेड जिल्ह्यात करुन साता-याला जाणारे जी. श्रीकांत यांच्यावर नांदेडचे खरोखरच काहीतरी कर्ज असावे. अन्यथा युपीएसएस्सीतून निवड झाल्यानंतर महाराष्ट्र केडर, नांदेड जिल्हा आणि त्यानंतर परिविक्षाधिन कालावधी आणि सलग दोन वेळा पूर्णवेळ जबाबदारी मिळणे त्यांच्या भाग्यात नसते.
नांदेडसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्विकारताना डॉ. श्रीकर परदेशी यांच्या तुलनेत कामगिरी करु शकतो की नाही, याची शाश्वती मला नव्हती. निर्णय घेताना मी थोडे मागे हटतो. क्रिकेटमध्ये चांगली बॅटींग करणा-या श्रीकांत यांनी प्रशासकीय कामात त्यांनी आव्हानाला सामोरे जाण्याचे दाखवलेले धाडस कौतुकास्पदच नव्हे तर इतर सर्व अधिका-यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्याकडून मलाही बरेच काही शिकायला मिळाले आहे. भर सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांच्या विरोधात जाऊन आपल्या अधिका-यांना पाठिंबा द्यायला खुप मोठे धैर्य लागते. कार्यालयाप्रमुखाच्या अशा कृतीमुळे प्रामाणिकपणे व चांगले काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढत असते.
जिल्हा परिषदेपेक्षा मनपात काम करणे कठीण असते.  त्यामुळेच नवीन आयएएस अधिका-यांना आधी ज़िल्हा परिषद आणि नंतर महापालिकेत पाठवले जाते. पण श्रीकांत यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून पहिली पोस्टींग मिळाली, याचाच अर्थ त्यांच्या कार्यक्षमतेची शासनाला जाणीव असावी. नांदेड महापालिकेच्या उत्पन्न वाढविण्यापासून केलेल्या अनेक प्रशासकीय सुधारणेमुळेच त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात बोलावले आहे. याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, विद्या गायकवाड, यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, विभागप्रमुख, इतर अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, अभियंते, वास्तुविशारद, ठेकेदार, नागरिक उपस्थित होते.


Monday, July 21, 2014

बीएसयुपी लाभार्थ्यांना ताबापावती देण्यासाठी आजपासून विशेष शिबिर


नांदेड, दि.21: बीएसयुपी योजनेत ज्यांची घरे बांधून पूर्ण झाली आहेत, अशा लाभार्थ्यांना ताबा पावती देण्यासाठी उद्या मंगळवारपासून (दि.22) दर मंगळवारी झोननिहाय विशेष शिबिर घेतले जाणार आहे. ताबा पावती हस्तांतरीत होना-या लाभार्थ्यांना बायोमेट्रिक कार्ड देण्यासाठी याच शिबिरात त्यांची माहिती व इतर तपशिल संकलीत केला जाणार आहे. या शिबिरासाठी उप अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सहा क्षेत्रिय कार्यालयात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
      नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या बीएसयुपी प्रकल्पांतर्गत झोपडपट्टीधारकांना 27 हजार पक्की घरे बाधून देण्यात येत असून त्यातील 15 हजार लाभार्थ्यांची घरे बांधून पूर्ण झाली आहेत. यातील 70 ते 80 टक्के घरांमध्ये लाभार्थी राहायला गेले आहेत. परंतु बहुतेक जणांकडे ताबा पावती नसल्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा अधिकृतपणे लाभ मिळण्यात त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर घर ताब्यात घेतलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलाचा लोकवाटा पूर्णपणे भरलेला आहे की नाही, याची पडताळणी करणे आवश्यक असल्याने शिबिराद्वारे ताबा पावती वाटप करुन दुसरीकडे लोकवाटा भरण्यात दिरंगाई करणा-या लाभार्थ्यांना शोधण्याचे कामही यानिमित्ताने केले जाणार आहे.
या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी सर्व पथकांना कालबध्द कार्यक्रम निश्चित करुन देण्यात आले आहे. पथकांनी दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान ताबा पावती लिहून, तपासून त्यावर कार्यकारी अभियंता व उपायुक्त यांच्या स्वाक्षरीसाठी तयार ठेवावे. सोमवारी सायंकाळी या दोन अधिका-यांच्या स्वाक्ष-या घेऊन ताबा पावती वाटपासाठी तयार ठेवाव्यात. संबधित क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरात रस्त्याला लागून असलेल्या किंवा सर्वांना येणे सोयीचे ठरेल अशा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी समारंभपुर्वक दर मंगळवारी ताबा पावतीचे वाटप करावेत, अशा सूचना लेखी आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.
      झोननिहाय पथकप्रमुख उप अभियंत्यांची नावे अशी: झोन क्र. 1, शिवाजीनगर : सुनील देशमुख, झोन क्र. 2, अशोकनगर : एम. एस. बोधनकर, झोन क्र. 3 इतवारा व झोन क्र.4, वजिराबाद : नरेंद्र सुजलेगावकर, झोन क्र. 5, सिडको: दिलीप आरसुडे, झोन क्र. 6, तरोडा: विश्वनाथ स्वामी. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या दैंनदिन मुलभूत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी बीएसयुपी, पाणीपुरवठा व मल:निसारण, आरोग्य व स्वच्छता तसेच विद्युत विभागाच्या अधिकारी किंवा जबाबदार कर्मचा-यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमास त्या-त्या परिसरातील महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक/नगरसेविकांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

            

महापालिकेच्या वृक्षदिंडीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ





नांदेड, दि.21: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सोमवारी (दि.21) आयोजित वृक्षदिंडीला उदंड प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते स्टेडीयम परिसरात या वृक्षदिंडीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. वृक्षदिंडीनंतर बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रमास उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती इतरत फातेमा, उपसभापती पार्वती जिंदम, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक गोविंद बिडवई यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथून सकाळी 8.30 वाजता निघालेल्या वृक्षदिंडीत मनपा आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त डॉ. निशीकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, डॉ. विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी पी. पी. बंकलवाड, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, संजय जाधव, सुधीर इंगोले, अविनाश अटकोरे, गणेशराव आडेराघो, एस. टी. मोरे, विलास भोसीकर, उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा बेग, शिक्षणाधिकारी जोशी, नोडल ऑफ़ीसर विलास पांचाळ, व्यंकटेश जिंदम, सय्यद शोहेब यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी चालत सहभागी झाले होते.
ही वृक्षदिंडी आयटीएम-रेल्वे स्टेशन रस्ता, बिग सिनेमा (ज्योती टॉकीज), शहाजी मार्केट, शिवाजीनगर उड्डाणपुल, कलामंदीर, मुथा चौक, शिवाजी पुतळा मार्गे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पोहचली. तेथे दोन विद्यार्थ्यांचे प्रातनिधीक स्वरुपात मनोगत झाल्यानंतर मनपा शाळेचे सर्व विद्यार्थी आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी बोंढार येथे रवाना झाले. बोंढार येथे मनपा आयुक्तांसह मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी लावलेल्या वृक्षाला विविध मान्यवरांची नावे देण्यात आली. या परिसरातील जलकुंभाच्या परिसरात जवळपास एक हजार झाडे लावण्याचे काम दिवसभर सुरु होते. बोंढार मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या निसर्गरम्य परिसरात विद्यार्थ्यांनी यावेळी सहलीचाही मनमुराद आनंद लुटला.


Sunday, July 20, 2014

महापालिकेची आज वृक्षदिंडी आणि महा वृक्षारोपण

नांदेड, दि. 20: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सोमवारी (दि.21) सकाळी 8 वाजता श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत मनपा शाळेचे विद्यार्थी व महापालिकेच्या अधिकारी- कर्मचा-यांच्या सहभागातून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

मागील वर्षी कृषी विद्यालयाच्या परिसरात हा उपक्रम घेण्यात आला होता. यावर्षी महापालिकेच्या वतीने कार्यान्वित झालेल्या बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात महा वृक्षारोपण करुन तेथील पर्यावरणाच्या संवर्धनाचा संकल्प महापालिकेने सोडला असून या स्थळाला भेट देणा-या मान्यवरांना हे स्थळ रमणीय अनुभवण्यास मदत होणार आहे. याच परिसरात शहरातील घाण पाण्यावर शुध्दिकरणाची प्रक्रिया होणार असल्याने येथे बारमाही पाण्याची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे झाडांचे संगोपन करण्याची व्यवस्था आणखी सुलभ होणार आहे.

महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती इतरत फातेमा, उपसभापती पार्वती जिंदम, गटनेत्या डॉ. शीला कदम, सय्यद शेरअली यांच्यासह सर्व सदस्य, सदस्या व महापालिकेच्या अधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल.

वृक्षदिंडीत महापालिकेच्या शाळेतील सुमारे 400 विद्यार्थी सहभागी होणार असून हे सर्व विद्यार्थी व महापालिकेचे अधिकारी- कर्मचारी वृक्षदिंडीनंतर महा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी बोंढार येथे रवाना होतील. या उपक्रमासाठी नांदेड नेचर क्लबनेही सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. नागरिक आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांमध्ये वृक्षारोपणाचे महत्व वाढून पर्यावरणाचे रक्षण व्हावे, हा या उपक्रमामागचा हेतु आहे.

--------–--------------------

फ़ोटो ओळी:
बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात सोमवारी होणा-या महा वृक्षारोपण कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

Saturday, July 19, 2014

सिडको क्षेत्रिय कार्यालय व अधिका-यावरील हल्ल्याचा मनपा सर्वसाधारण सभेने नोंदवला निषेध


महापालिका कर्मचा-यांचे काळ्या फ़िती लावून आंदोलन
नांदेड, दि.19: सिडको क्षेत्रिय कार्यालयावर झालेली दगडफ़ेक आणि तेथील सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शनिवारी (दि.19) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने निषेध नोंदवण्यात आला. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी शनिवारी (दि.19) काळ्या फ़िती लावून काम करीत आपला निषेध नोंदवला.
      सिडको येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत अनाधिकृतपणे सुरु असलेल्या कोचिंग क्लासेसला सील ठोकल्याच्या कारणावरुन काही लोकांनी सिडको क्षेत्रिय कार्यालयात जमावासह येऊन सहायक आयुक्त गुलाम सादेख यांना जबर मारहाण करुन कार्यायावर दगडफ़ेक केली. हल्लेखोरांनी सादेख यांच्या कक्षातील काच व फ़र्निचरची नासधूस करुन दहशत निर्माण केली. या घटनेप्रकरणी काल शुक्रवारी (दि.18) दुपारी दोनपासून कार्यालयीन वेळ संपेपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करुन महापौर अब्दुल सत्तार व मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
      या घटनेची शनिवारी झालेया सर्वसाधारण सभेनेही दखल घेतली. विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, नगरसेवक रामनारायण काबरा आणि विनय गिरडे यांनी या विषयाकडे आयुक्तांचे लक्ष वेधून घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर सदर घटनेत महापालिकेच्या अधिका-यांचीही चूक असेल तर चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर उपस्थित सर्व नगरसेवकांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.

      सदर घटनेच्या व हल्लेखोरांच्या चिथावणीवरुन सादेख यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शनिवारी महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयासह विविध विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी काळ्या फ़िती लावून आपला आक्षेप नोंदवला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही आयुक्तांसह सर्व अधिकारी व विभागप्रमुखांनी काळ्या फ़िती लावूनच कामकाज केले.

मनपाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा: आयुक्त


नांदेड, दि.19: सिडको क्षेत्रिय कार्यालयावर शुक्रवारी झालेल्या दगडफ़ेकीच्या घटनेमुळे यापुढे सर्व क्षेत्रिय कार्यालये तसेच नागरिकांशी नित्य संबध येणा-या मनपाच्या विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संभाव्य घटनेस प्रतिबंध करण्याची पूर्वतयारी करावी, अशी सूचना मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी शनिवारी (दि.19) सामान्य प्रशासन विभागाला केली.
सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर उपस्थित होऊ शकणा-या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित विभागप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, डॉ. विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी पी. पी. बंकलवाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्त आणि विविध विभागप्रमुख उपस्थित होते. 
महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालय आणि अधिका-यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत दु:खद असून हल्लेखोरांच्या वतीने काही लोकांनी खोटी तक्रार करुन गुन्हा नोंदवण्यास भाग पाडल्याचे कळाल्यानंतर आपण पोलिस अधिक्षकांशी चर्चा केली आहे. जमाव पांगवण्याच्या उद्देशाने कदाचित प्रतितक्रार स्विकारुन पोलिसांनी असे केले असावे. कर्तव्य बजावताना महापालिका अधिकारी व कर्मचा-यांनी खचून जाऊ नये. प्रशासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात आयुक्तांनी सर्वांना आश्वस्थ केले.
मुलभूत सुविधा पुरवताना महापालिकेस अनेकदा अप्रिय कारवाई करावी लागते. अशा प्रसंगी सर्व क्षेत्रिय कार्यालय, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभाग, बीएसयुपी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध सेवा पुरविणा-या विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसविण्यात यावेत, अशी सूचना उपायुक्त विद्या गायकवाड यांना केली. कर्तव्य बजावताना कोणीही दबाबतंत्राचा वापर करुन अडथळा आणण्याची शक्यता असल्यास  मला तात्काळ कळवावे. त्यातून संबधितांवर कसे नियंत्रण आणता येईल, याचा निर्णय घेता येईल. आक्षेपकर्त्यांसोबत वादाचे प्रसंग टाळून सौम्य भाषेत संभाषण करुन त्यांना माझ्याकडे किंवा अप्पर आयुक्तांकडे पाठवावे. संबधितांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

           

Friday, July 18, 2014

इतवारा हद्दीत हातगाड्यांना शिस्त लावण्यासाठी विशेष पथक

इतवारा हद्दीत हातगाड्यांना शिस्त लावण्यासाठी विशेष पथक

नांदेड, दि.16: रमजान महिन्यात इतवारा भागात साहित्य खरेदीसाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता पोलिस अधिका-यांच्या विनंतीवरुन महापालिकेने त्या भागातील हातगाड्यांना शिस्त लावण्यासाठी दोन विशेष संयुक्त पथकाची स्थापना केली आहे.
       हबीब टॉकीज- बर्की चौक - मन्नीयार गल्ली-देगलूर नाका या परिसरात हातगाडेचालक रस्त्यावर उभे राहून वाहतूक व पादचारी मार्गावर अडथळा निर्माण करीत असतात. त्याकरिता वाहतूक व रहदारी व्यवस्थेत पोलिसांच्या मदतीसाठी मन्नीयार गल्ली हबीब टॉकीजचौकासाठी झोन क्रमांक 3 चे नगर निरिक्षक मिलिंद पेकमवार आणि देगलूर नाका परिसरासाठी इमारत निरिक्षक अशपाक अली खान यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दहा जणांचे संयुक्त विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक दि. 14 ते 30 जुलै 2014 या कालावधीत दुपारी 2 ते रात्री 10 दरम्यान संबधित परिसरात कार्यरत राहणार असून इतवाराचे सहायक पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. सदर पथकावर झोन क्र. 3 (इतवारा) चे सहायक आयुक्त यांचे नियंत्रण राहील.

                                                     


व्यापारी प्रतिष्ठांनाना एलबीटी विवरणपत्रे दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत संधी

व्यापारी प्रतिष्ठांनाना एलबीटी विवरणपत्रे
दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत संधी
नांदेड, दि.18: स्थानिक संस्था कर नियम 2010 नुसार मनपा क्षेत्रातील व्यापा-यांनी त्यांची वार्षिक विवरणपत्रे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. नोटीस देऊनही ज्या व्यापा-यांनी आपली विवरणपत्रे अद्याप सादर केली नाहीत, अशा व्यापा-यांना दि. 31 ऑगष्ट 2014 पर्यंत विवरणपत्रे सादर करण्यास महापालिकेने मुदतवाढ दिली आहे.
स्थानिक संस्था कर नियम 2010 मधील नियम 29 (1) अन्वये नमुना ड- एक व नमुना ड- दोन मधील नुसार सर्व व्यापा-यांनी त्यांच्या व्यापारी प्रतिष्‍ठानाची वार्षिक विवरणपत्रे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. उशिरा वार्षिक विवरणपत्रे दाखल करणा-या, व्यापारी प्रतिष्ठानांना नियम 48 (6) नुसार पाच हजार रुपयापर्यंत शास्ती लावण्याची तरतूद आहे. परंतु अद्याप देखील काही व्यापारी प्रतिष्ठानांना नोटीस देवुन देखील विवरणपत्रे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे अशा व्यापारी प्रतिष्ठानांना दि. 31 ऑगस्ट 2014 पर्यंत विवरणपत्रे सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात येत आहे. व्यापारी प्रतिष्ठानांनी ‍वार्षिक विवरणपत्रे संपूर्ण अभिलेख्यासह सादर करावीत. सदर मुदतीत जे व्यापारी प्रतिष्ठाने वार्षिक विवरणपत्रे दाखल करणार नाहीत त्यांचेविरुध्द स्थानिक संस्था कर नियम 2010 मधील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

                                                     


पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी: महापालिका


आजारांच्या लक्षणाआधीच करा प्रतिबंधात्मक उपाययोजना
नांदेड, दि.17: पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याची रोगांचा प्रतिकार करण्याची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेशी काळजी घेणे आवश्यक असून पाण्याच्या साठ्वणुकीपासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी डेंगू, चिकनगुनिया, हिवताप व इतर आजाराची लक्षणे दिसण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात घर, परिसरात तसेच रिकामी भांडी, टिनचे डबे, टायर अथवा अन्य वस्तूत पावसाचे पाणी साठू देऊ नका. घरातील पाण्याचे साठे, रांजण, माठ, पीप, अथवा पाण्याची टाकी यावर झाकण घट्ट ठेवावे. घराभोवती खड्डे, डबकी असल्यास मुरूम किंवा भर टाकून भरून घ्यावे. नाले, गटारे साफ करून सांडपाणी वाहते ठेवावे.
साठवण साधने दर आठवड्यास धुवा
जनावरांसाठी अथवा कपडे धुण्यासाठीचे पाण्याचे हौद, टाक्या किंवा पाणी साठवण क्षमतेची अन्य साधने दर आठवड्यास स्वच्छ धुवून, पुसून कोरडी करावी. कुलर, फुलदाणी, पाण्याची कारंजी, यातील पाणी दर आठवड्यास काढून टाकावे.
झोपताना घ्या ही काळजी
डासांच्या सवयी लक्षात घेता सायंकाळच्या वेळी घराची दारे खिडक्या बंद करून घ्यावे. खिडक्यांना जाळीदार पडदे लाऊन घेणे. झोपताना उघड्या अंगाने झोपू नका. विशेषतः  लहान बाळाची काळजी घ्या. शक्य झाल्यास मच्छरदानी, डास प्रतिबंधक मलम, धुरी अथवा अगबत्तीचा वापर करावा.
लक्षणे दिसताच डॉक्टरला तात्काळ भेटा
ताप आलेल्या व्यक्तीची डॉक्टरकडून तात्काळ तपासणी करुन घ्यावी. ही सुविधा सरकारी दवाखाने व मनपा दवाखान्यात उपलब्ध आहे. मनपा आरोग्य सेवेतील कर्मचारी व त्यांचे मदतनीस आणि जनतेचा सहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण हिवताप, डेंगू व चिकुनगुनिया या आजाराला मुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिवतापाची लक्षणे
१. या आजारात थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते.
२. ताप एकदिवसा आड किंवा दोन दिवसाआड येतो.
३. आजारात सर्व अंग दुखते, डोखे दुखते, पांघरुन घ्यावेसे वाटते. त्यानंतर घाम येउन ताप कमी होतो. आणि रुग्णास थकवा येतो.
४. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उपचार अत्यंत आवश्यक आहे. उपचार न केल्यास वारंवार ताप येतो. प्रसंगी रुग्ण बेशुद्धदेखील होऊ शकतो.
डेंगूची लक्षणे
१. या आजारात दोन ते सात दिवस तीव्र ताप असतो.
२. तीव्र डोके दुखी, स्नायू दुखी व सांधे दुखी.
३. उलट्या होणे.
४. डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे.
५. अंगावर पुरळ, त्वचेखाली नाक तोंड मधून रक्त स्राव.
६. अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे.
चिकुनगुनियाची लक्षणे
१. या आजारात कमीत कमी मुदतीचा तीव्र ताप.
२. डोकेदुखी, अंगदुखी व तीव्र सांधे दुखी.
३. तीव्र सांधेदुखीमुळे माणूस वाकून जातो.
४. काही रुग्णाच्या अंगावर पुरळ आढळून येतात.
५. 15 ते 20 टक्के रुग्णामध्ये सांधे दुखी, 10 दिवस ते तीन महिन्यापर्यंत राहते.



अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन




नांदेड, दि.18: ज्येष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्युत भवन शेजारच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शुक्रवारी (दि.18) महापालिकेतर्फे उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, डॉ. विद्या गायकवाड, नगरसेवक नवल पोकर्णा, डॉ. विश्वास कदम, माजी प्रभाग सभापती महेश कनकदंडे, व्यंकटेश जिंदम, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, शिक्षणाधिकारी भागवत जोशी, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, शिवाजी डहाळे, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, प्रकाश कांबळे, पुतळा संरक्षण समितीचे भारत खडसे, जी. नागय्या आदी उपस्थित होते. मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. 

Friday, July 4, 2014

बालाप्रसाद करवा यांचे निधन


बालाप्रसाद करवा यांचे निधन
नांदेड, दि. 4:  हदगाव येथील व्यापारी बालाप्रसाद मदनलाल करवा (वय65) यांचे शुक्रवारी (दि.4) दुपारी 2 वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने हदगाव येथे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.5) सकाळी 9 वाजता हदगाव येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, हदगावचे विमा प्रतिनिधी गोपाल करवा आणि नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे प्रा. अमोल करवा यांचे ते वडील होत.

नूतन आयएएस माधव सुलफ़ुले साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

महापालिकेच्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन अभ्यास वर्गात
नूतन आयएएस माधव सुलफ़ुले साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

आजचा कार्यक्रम 5 ऐवजी 4 वाजता
नांदेड, दि.4: नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी परिक्षेच्या निकालात देशातून 387 वा रॅन्क मिळवलेले नांदेड्चे भूमिपुत्र माधव सुलफ़ुले हे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात युपीएससी/एमपीएससी परिक्षेची पूर्वतयारी करणा-या विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गाचा कार्यक्रम शनिवारी (दि.5) सायंकाळी 5 ऐवजी दुपारी 4 वाजता सुरु होईल. याची सर्वांनी नोंद घेऊन वेळेवर उपस्थित राहावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धा परिक्षेची पूर्वतयारी करणा-या युवक-युवतींसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दर महिण्याच्या 5 तारखेला शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात स्पर्धा परिक्षेची पूर्वतयारी, विषयाचे महत्व, मुद्यांची मांडणी, अभ्यासाचे पूर्वनियोजन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या बौध्दिक कौशल्यात भर पडण्यासाठी सामान्य ज्ञान, प्रश्नोत्तरे व प्रश्नमंजुषाचा कार्यक्रमही घेतला जाणार असून शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात नोकरीच्या उपलब्ध संधींची माहितीही यावेळी सादरीकरणाद्वारे दिली जाणार आहे. त्याचा सर्वांनी लाभ घेऊन 5 ऐवजी 4 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाठलाग करुन यशाला गवसणी
माधव राचप्पा सुलफ़ुले हे मूळचे पांडुर्णी, ता. मुखेड येथील रहिवासी असून त्यांनी नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून टेक्सटाईल्स अभियंता ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळवल्यानंतर 2013 साली ते नाशिक येथे विक्रीकर निरिक्षक म्हणून रुजू झाले. तत्पुर्वी 2008 पासून ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करीत होते. 2011 साली ते मुलाखतीपर्यंत पोहचले; परंतु निवडीची संधी मात्र हुकली. अपयशाने अजिबात खचून न जाता यशाचा परिश्रमपूर्वक पाठलाग केल्यामुळे पाचव्या प्रयत्नात सुलफ़ुले यांनी अखेर यशाला गाठून देशात 387 व्या क्रमांकाद्वारे आयएएस संवर्गात पात्र होण्याचा मार्ग मोकळा केला. सुलफ़ुले यांनी मुखेड, नांदेड व अहमदपूर अशा ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण केले. 


Thursday, July 3, 2014

डॉ. निशिकांत देशपांडे यांनी सूत्रे स्वीकारली

नांदेड, दि. 3: महापालिकेचे अप्पर आयुक्त म्हणून डॉ. निशिकांत देशपांडे यांनी आज गुरुवारी (दि.3) दुपारी रा. ल. गगराणी यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. देशपांडे हे यापूर्वी नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील श्री. गगराणी हे गेल्या अडीच वर्षापासून महापालिकेत अप्पर आयुक्त म्हणून काम पाहत होते. डॉ. देशपांडे यांची प्रतिनियुक्तीद्वारे या पदावर बदली केल्यानंतर गगराणी यांना त्यांच्या महसूल व वन खात्यात रुजू होण्याचे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले होते. नवे अप्पर आयुक्त डॉ. देशपांडे यांचा उपायुक्त (महसूल) राजेंद्र खंदारे व इतर अधिका-यांनी स्वागत करुन अडीच वर्षात महापालिकेमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल गगराणी यांचे आभार मानले.