Wednesday, August 20, 2014

नांदेड ‘सेफ़ सिटी’ प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण





        ठळक वैशिष्ट्ये:
·     वाहतूक नियंत्रण
·         चोरांपासून संरक्षण
·         अपघातांवर नियंत्रण
·         कायदा व सुव्यवस्थेसाठी उपयुक्त
·         आपातकालीन परिस्थितीत ध्वनीक्षेपनाद्वारे थेट सूचना प्रसारण
·         अत्याधुनिक नियंत्रण कक्ष
·         सीसीटीव्ही कॅमेरामुळे संपूर्ण शहराची सुरक्षितता

      नांदेड, दि.20: जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत नांदेड महापालिकेने पोलिस दलासाठी साकारलेल्या सेफ़ सिटी प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी (दि.21) सकाळी 9.30 वाजता पोलिस अधिक्षक कार्यालयातीच्या इमारतीतील सी क्युब केंद्रात होणार आहे. अवघ्या 11 महिन्यात पूर्ण झालेल्या या प्रकल्पांतर्गत शहरातील 50 प्रमुख ठिकाणी 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून आतापर्यंत या प्रकल्पावर 4 कोटी 7 लाख रुपये खर्च झाला आहे.
        उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमास गृहमंत्री आर. आर. पाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. माजी मुख्यमंत्री व नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मूळ संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला असून जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष व पालकमंत्री ना. डी. पी. सावंत यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन प्रकल्पासाठी खूप मोलाची मदत केली आहे.
          आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती इतरत फ़ातेमा, उपसभापती पार्वती जिंदम, गटनेते डॉ. शीला कदम, सय्यद शेर अली यांच्यासह सर्व नगरसेवक/नगरसेविका तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी या प्रकल्पासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
कायदा व सुव्यवस्थेवर थेट नियंत्रण
        या प्रकल्पामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर थेट नियंत्रण ठेवण्याबरोबरच विविध उत्सव, कार्यक्रम, गुन्हे व वाहतूक नियंत्रण, वाहतूक नियोजन तसेच आपातकालीन परिस्थितीत सूचना प्रसारणाचे काम प्रभावीपणे केले जाणे शक्य झाले आहे. शहरातील सर्व वाहतूक मार्ग, प्रमुख ठिकाणे, कायदा व सुव्यवस्था संचालनासाठी पोलिस दलास नेहमी आवश्यकता भासणारी ठिकाणे, प्रमुख प्रार्थनास्थळे, शहरातील सर्व प्रवेश व निकास मार्ग, प्रशासकीय कार्यालये अशा 50 ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अत्युच्च क्षमतेचे 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात 75 स्टॅन्डबाय आणि 25 पीटीझेड कॅमेराचा समावेश आहे.
फ़िरत्या वाहनावरही थेट नियंत्रण
        सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नसल्याने पोलिस दलाच्या चार आणि मनपा अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम विभागाच्या एक अशा पाच वाहनांवर दोन्ही बाजूने प्रत्येकी एक कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी हे वाहन जाईल, तेथील स्थितीची थेट पाहणी नियंत्रण कक्षात बसून करताना घटनास्थळी सूचनांचे प्रसारण करणे शक्य होणार आहे.
अत्याधुनिक नियंत्रण कक्ष
प्रकल्पाचे संपूर्ण नियंत्रण पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फ़त केले जाणार असून त्याकरिता नियंत्रण कक्षाशेजारी एक स्वतंत्र प्रशस्त व अत्याधुनिक प्रणालीचा कक्ष विकसित करण्यात आला आहे. सर्व कॅमेराच्या ठिकाणी एकाच वेळी अथवा स्वतंत्रपणे सूचना देणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. या प्रणालीमुळे नियंत्रण कक्षात बसून थेट दृश्य पाहून तेथूनच सूचना देता येतील.
21 वाहनांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम
        महापालिका आणि पोलिस दलाची वाहने घटनास्थळापासून किती अंतरावर आहेत, याचे निरिक्षण करुन घट्नास्थळावर वेळेत पोहचण्यासाठी पोलिसांच्या 21 आणि महापालिकेच्या चार वाहनांवर व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे सदरची वाहने नेमकी शहराच्या कुठल्या भागात आहेत हे वेब पोर्टलद्वारे कळू शकणार आहे. तसेच संबधित वाहने मागील कालावधीत कोणत्या वेळेस कोठे आणि किती वेळ थांबली होती, याचा जागेच्या स्थळ नकाशासह पुरावा मिळणार आहे.
चो-या आणि अपघातांच्या तपासात मदत
        या प्रकल्पाच्या नेटवर्कसाठी मनपा स्वत:ची ओएफ़सी केबल वापरणार आहे. शहरात आतापर्यंत 45 किलोमीटरची केबल टाकण्यात आली आहे. मागच्या पाच सहा महिन्यात झालेल्या अनेक चो-या सीसीटीव्ही कॅमेरातील फ़ुटेजमुळे उघडकीस आल्या असून चोरांची ओळख पटवून त्यांना पकडणे शक्य झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या दृष्टीपथात असलेल्या भागातील होणारे सर्व अपघात थेट दिसत असल्याने जवळच्या पोलिस ठाण्याला तात्काळ कळविण्याबरोबरच घटनेत चूक कोणाची होती, हे देखील थेट दिसून येते. त्यामुळे अपघाताचे गुन्हे निकाली काढण्यास मदत होत आहे.
रेतीचोर शोधून जिल्हाधिका-यांनी ठोठावला 22 लाखाचा दंड
        जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी एक दिवस या प्रकल्पाची पाहणी करताना शहरात अवैधरित्या रेती आणणा-या वाहनांना पकडून त्यांना 22 लाखाचा दंड ठोठावला होता. अवैध किंवा गैरकृत्य करणारी मंडळी शहरात कुठेही फ़िरली तरी या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना शोधून कारवाई करणे सोयीचे झाले आहे.

दुस-या टप्प्यातील योजना
        या प्रकल्पाच्या दुस-या टप्प्यात वाहतुकीचे नियम मोडणा-यांना दंडाची पावती त्यांच्या घरी पाठवून कारवाई करणारी ई-चलान योजना अस्तित्वात आणण्याचा मानस आहे. त्याचबरोबर पूररेषेतील बाधित कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यापासून त्यांना मदत देणे व नियंत्रणाचे कामही उपयुक्त होणार आहे.

        जिल्हाधिकारी धीरजकुमार, तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक परमजितसिंघ दहिया, आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, उपायुक्त विद्या गायकवाड, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे यांच्या अथक परिश्रमातून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.   

Saturday, August 16, 2014

महापालिकेच्या योजनांचा प्रसार करण्याचा वासवी क्लबचा उपक्रम स्तुत्य: पालकमंत्री




102 जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे थाटात वितरण
नांदेड, दि.16: विवाह नोंदणी प्रमाणपत्राबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करुन त्यांना सहभागी करण्याचा वासवी क्लबचा उपक्रम स्तुत्य असून महापालिकेनेही असे उपक्रम घेणा-या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व वैद्यकीय शिक्षण, तंत्रशिक्षण, अपारंपारिक उर्जा व विशेष सहाय राज्यमंत्री तसेच नांदेडचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी शुक्रवारी (दि.15) केले.
      महापालिका व वासवी क्लबच्या संयुक्त विद्यमाने मनपा क्षेत्रातील सहाही क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विवाह नोंदणी केलेल्या 102 जोडप्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महापौर अ. सत्तार अ. गफ़ूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी धीरजकुमार, आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, नगरसेवक दिलीप कंदकुर्ते, वासवी क्लबचे गव्हर्नर डॉ. नरेश रायेवार, व्याख्याते राऊत सर, उपायुक्त राजेंद्र खंदारे, विद्या गायकवाड, व्यंकटेश जिंदम, व्यंकट मुदीराज, वासवी क्लबचे अध्यक्ष रितेश व्यवहारे, सचिव प्रशांत चालिकवार, कोषाध्यक्ष संदीप नांदेडकर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमत्री सावंत म्हणाले, शासनाच्या सर्व योजना जनतेशी अर्थात समाजाशी निगडीत असतात, त्याकरिता त्याचा प्रसार करणे ही केवळ सरकारची नव्हे तर स्वयंसेवी संस्थांचीदेखील सामाजिक जबाबदारी आहे. मी लॉयन्स क्लबचा अध्यक्ष असताना यासारखे काही उपक्रम राबवल्यानंतर मला लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. महापालिकेने ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम सुरु केल्याबद्दल अभिनंदन करुन त्यांनी कार्यक्रमात प्रमाणपत्र मिळविणा-या जोडप्यांचे अभिनंदन केले. या प्रमाणपत्रामुळे तुम्ही आज कायदेशीर पती-पत्नी झाला आहात. या प्रमाणपत्राची खूप आवश्यकता भासेल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, की कुटुंबात वावरताना विवाह ही सामाजिक जबाबदारी असते. आयुष्यातील महत्वाच्या एका संस्काराला कायदेशीर स्वरुप देण्याचा वासवी क्लबचा उपक्रम इतरांसाठी अनुकरनीय आहे. मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात महापालिकेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरणास 2008 पासून सुरुवात झाल्याचे सांगून आजपर्यंत दोन हजार 300 दांम्पत्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे नमूद केले. प्रशांत चालिकवार यांनी प्रास्ताविक हा उपक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली. रितेश व्यवहारे यांनी वासवी क्लबच्या उपक्रमाची माहिती दिली. दुपारच्या सत्रात गटनेते सय्यद शेरअली, अख्तर हुसेन यांच्या हस्तेदेखील प्रमाणपत्राचे वितरण झाले. शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती इतरत फ़ातेमा यांनी कार्यक्रमास भेट देऊन सर्व दाम्पंत्यांना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचलन विजय बंडेवार यांनी केले. संदीप नांदेडकर यांनी आभार मानले, कार्यक्रमास सहायक आयुक्त एस. टी. मोरे, डॉ. विजयकुमार मुंडे, सुधीर इंगोले, जगदीश कुलकर्णी, मनपाचे उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा फ़रतुल्ला बेग, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे यांच्यासह महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयातील विवाह नोंदणी व संगणक कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.

विष्णुपुरी जलाशयातील अनाधिकृत उपसा रोखण्यासाठी दक्षता पथकाची नियुक्ती करा


  • जिल्हाधिका-यांच्या महापालिकेला सूचना
  • पिण्याच्या 3.76 दलघमी पाण्याचा अवैध उपसा उघडकीस

नांदेड: विष्णुपुरी जलाशयातील पिण्यासाठी आरक्षित असलेल्या साठ्यापैकी 3.76 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचा सिंचनासाठी अनाधिकृतपणे उपसा झाल्याची बाब मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर अनाधिकृत उपसा तात्काळ बंद करुन त्यावर नियंत्रणासाठी दक्षता पथक स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी सर्व संबधित यंत्रणेला केल्या आहेत.
      नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी एकमेव स्त्रोत असलेल्या विष्णुपुरी जलाशयातील पाणी हे फ़क्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. सध्यस्थितीत अत्यंत कमी म्हणजे केवळ 17.09 टक्के इतकेच पर्जन्यमान झाले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासंबधी शासनाने मागील महिन्यातच सर्व प्रकारच्या शासकीय स्त्रोतातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करुन सर्व प्रकारच्या पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले होते.

विद्यमान आणि संभाव्य टंचाईची वाढती तीव्रता लक्षात घेता दि. 27 जुलै 2014 रोजी दिग्रस बंधा-यातील 8.68 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्याच्या वापरासाठी विष्णुपुरी जलाशयात सोडण्यात आले आहे. परंतु पिण्यासाठी आरक्षित केलेल्या साठ्यापैकी 3.76 दशलक्ष घनमीटर पाण्याचा अनाधिकृतपणे सिंचनासाठी उपसा केल्याचे उघडकीस आल्याची बाब मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी दि. 4 ऑगस्ट 2014 रोजी एका पत्राद्वारे जिल्हाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची गंभीर दखल घेऊन नांदेडचे पोलिस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना एका लेखी पत्राद्वारे विष्णुपुरी जलाशयातील अनाधिकृत उपसा रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी दक्षता पथक गठित करुन अनाधिकृत पाणी उपशावर नियंत्रण ठेवावे, असेही या पत्रात कळविण्यात आले आहे.       

Thursday, August 14, 2014

स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिकेत महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण




नांदेड, दि. 15: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनानिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.15) ध्वजारोहण झाले.   
कार्यक्रमास आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार अमर राजूरकर, उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण महिला व बालकल्याण समिती सभापती इतरत फ़ातेमा, उपसभापती पार्वती जिंदम, गटनेत्या डॉ. शीला कदम, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, विद्या गायकवाड,  कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, नगरसेवक सर्वश्री किशोर भवरे, दिलीप कंदकुर्ते, शफ़ी अहेमद कुरेशी, बालासाहेब देशमुख, प्रमोद उर्फ़ बंडू खेडकर, ऍड. श्याम बन, स. गुरमितसिंघ उर्फ़ डिंपल नवाब, फ़ारुख हुसेन, संजय मोरे, शंकर गाडगे, सोनाबाई मोकले, गंगाबाई कदम, डॉ. करुणा जमदाडे, डॉ. ललिता बोकारे-शिंदे, रजिया बेगम यांच्यासह इतर नगरसेवक, नगरसेविका, माजी सभापती विनय सगर, अमितसिंह तेहरा, दत्ता कोकाटे, पांडुरंग काकडे, व्यंकटेश जिंदम, संदीप गायकवाड, अ. गफ़ार अ. सत्तार, दर्शन राजूरकर, केशव मोकले, महापालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, क्षेत्रिय अधिकारी, विविध विभागप्रमुख, कर्मचारी इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेचे पोलिस पथकप्रमुख श्री. भराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने मानवंदना दिली. ध्वजवंदन कार्यक्रमानंतर समिती सभागृहात झालेल्या चहापान कार्यक्रमात महापौर अब्दुल सत्तार, आमदार अमर राजूरकर, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.



Tuesday, August 5, 2014

केवळ सात तासात 282 उमेदवारांच्या थेट मुलाखती


  • एनयुएचएमच्या महाभरतीत महापालिकेने नोंदवला विक्रम
  • 55 जागेसाठी 1692 जणांचे अर्ज
  • उमेदवारांना मुलाखतीतच गुण सांगण्याचा पहिलाच प्रयोग

नांदेड, दि. 5: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गतच्या 55 विविध जागेच्या भरती प्रक्रियेत 1692 उमेदवारांचे थेट अर्ज स्विकारण्यापासून त्यांची छाननी, मुलाखतीसाठी पात्र आणि अंतीम पात्र 55 उमेदवारांची निवड अशी संपूर्ण प्रक्रिया प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने केवळ 16 तासात राबवून नांदेड महापालिकेने आपल्या नावावर एक वेगळा विक्रम नोंदवला आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानात नांदेड मनपा क्षेत्राचा समावेश करण्यात आला असून या योजनेत 55 नवीन पदे मंजूर करुन महापालिकेस भरती करण्याच्या सूचना होत्या. या योजनेत शहरात आणखी चार रुग्णालये प्रस्तावित असून त्यामुळे मनपा क्षेत्रातील आरोग्य सेवेचे आणखी बळकट होणार आहे. या चारही रुग्णालयावर होणारा सर्व खर्च केंद्र सरकार करणार असून महापालिकेने रुग्णालयासाठी केवळ जागा किंवा इमारत उपलब्ध करुन द्यावयाची आहे.
भरतीसाठी दि. 25 जुलै रोजी उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांसह थेट आमंत्रित करुन त्यांचे अर्ज सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत स्विकारण्यात आले. अर्ज भरतानाच उमेदवारांनाच त्यांच्या शैक्षणिक अहर्तेतील निश्चित केलेल्या गुणांच्या तुलनेत त्यांना छाननीअंती मिळणा-या गुणांचा तक्ता भरण्याची पध्दत समजावून सांगण्यात आली. त्याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी दोन स्वतंत्र टेबलवर अधिकारी व कर्मचा-यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. मुलाखतीस पात्र ठरण्यापुर्वीच सरासरी गुण कळत असल्यामुळे ही पध्दत सुलभ आणि योग्य असल्याची खात्री उमेदवारांनाही पटली. त्यामुळे कमी गुण मिळणारे छाननीची यादी लागण्यापुर्वीच घरी परतले.
दुपारी 2 ते 5 यावेळेत छाननीची प्रकिया पूर्ण झाली. त्यात एका पदास पाच याप्रमाणे पारिचारिकेच्या 35 पदांसाठी 177, स्टाफ़ नर्सच्या 10 पदांसाठी 50, फ़ार्मासिस्टच्या 5 पदांसाठी 26, लॅब टेक्नीशियनच्या 5 पदांसाठी 29 अशा एकूण 282 उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार दि. 26 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीला बोलावण्यात आले.
निवड समितीने द्यावयाचे 10 गुणांचे निकष ठरविण्याचे अधिकार निवड समिती अध्यक्षांना अर्थात आयुक्तांना होते. त्याचा योग्य वापर करण्यासाठी प्रभारी आयुक्तांनी स्वत:भोवतीच आचारसंहिता लावून या प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणली. मुलाखतीत उमेदवारांना त्यांचे अतिरिक्त शिक्षण आणि अनुभव अशा दोन निकषाच्या आधारे ज्यांचे अतिरिक्त शिक्षण व अनुभव जास्त अशा पध्दतीने उतरत्या क्रमाने तात्काळ निवड यादी लावली.
 एवढ्या मोठ्या संख्येने प्रत्येक उमेदवारांची वेगळी मुलाखत घेण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता होती. परंतु मुलाखत गुणांचा तक्ताच निश्चित केल्याने आलेल्या उमेदवारांना केवळ त्यांचे केवळ गुण सांगण्याचीच औपचारिकता शिल्लक होती. त्यामुळे डॉ. देशपांडे यांनी एकाच वेळी एका पदाच्या 5-5 उमेदवारांना त्यांच्या अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रासह बोलावून त्यांना देण्यात आलेले गुण मुलाखत सुरु असतानाच समजावून सांगितले. त्यामुळे संबधित उमेदवारांना आपली निवड होणार की नाही याची माहिती निवड यादीपुर्वी जाहीर होण्यापुर्वीच मिळाल्याने यात कोणालाही आक्षेप घेणे किंवा हस्तक्षेप करण्यास संधीच मिळाली नाही. जसजशी निवड झाली तसतशी लगेच यादीही जाहीर करण्यात आली.
स्टॉफ़ नर्सच्या शेवटच्या एका आणि परिचारिकेच्या शेवटच्या चार जागांसाठी मोठी चुरस झाली. या पदासाठी गुणानुक्रमे पात्र ठरणा-या अनुक्रमे 4 आणि 12 उमेदवारांना समान गुण मिळाल्याने त्यांना त्यांच्याकडील अतिरिक्त शैक्षणिक कागदपत्रे व अनुभवाचे दाखले असल्यास त्यासह दुस-या दिवशी बोलावण्यात आले. पात्र आणि प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या नावांची निशिच्ती करुन उर्वरीत उमेदवारांना अपात्र ठरण्यात आले.
उमेदवारांचे थेट अर्ज मागवून दुस-याच दिवशी छाननीअंती थेट मुलाखती आणि निवड असे नियोजन करण्यात आले होते. आधीचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत हे साता-याला बदलीवर गेल्यानंतर या भरतीची संपूर्ण धुरा प्रभारी आयुक्त डॉ. देशपांडे यांच्यावर आली. जिल्हा निवड समितीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध भरतीचा अनुभव पाठिशी असल्याने अचानक आलेली जबाबदारी समर्थपणे पेलताना वेगळे कौशल्य राबवून अधिक पारदर्शकता आणली.
उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यासाठी आधी सात टेबलची व्यवस्था केली होती. परंतु परिचारिका पदासाठी आलेल्या जास्त उमेदवारांची संख्या पाहता आणखी तीन टेबल वाढविण्यात आले. गरोदर किंवा तान्हे मूल सोबत असलेल्या महिलांचे अर्ज प्रथम प्राधान्याने स्विकारण्यात आले. प्रत्येक टेबलवर एक सहायक आयुक्त दर्जाचा अधिकारी, एक वैद्यकीय अधिकारी, एक वरिष्ठ लिपीक, दोन लिपीक व एक शिपाई असे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले होते. आलेले अर्ज थेट संगणकात नोंदवण्याची व्यवस्थाही टेबलवरच करण्यात आल्यामुळे तात्काळ छाननीची प्रक्रिया पार पाडली गेली. केवळ एक पोलिस अधिकारी 12 पोलिस कर्मचारी इतक्या कमी बंदोबस्तात ही प्रक्रिया शांततेत पार पडली.

या संपूर्ण प्रक्रियेत मनपाच्या उपायुक्त (प्रशासन) डॉ. विद्या गायकवाड यांनी उत्कृष्टपणे सर्वांचे समन्वय व संचालन केल्यामुळे अगदी शिस्तबध्द पध्दतीने आणि वेगाने सर्व प्रक्रिया पार पडू शकली. त्याबद्दल प्रभारी आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. महापालिकेचे उपायुक्त (महसूल) राजेंद्र खंदारे,  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मीरा कुलकर्णी, डॉ. सुरेशसिंह बिसेन, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, सहायक आयुक्त संजय जाधव, कार्यालय अधिक्षक एस. व्ही. गोरे, जमिल अहेमद, जुल्फ़ेकार अहेमद, वाय. जी. ढोणे, अशोक कदम, गजानन रासे, साहेबराव जोंधळे, रमेश हैबते यांच्यासह महापालिकेच्या विविध अधिकारी व कर्मचा-यांनीही मोलाचे परिश्रम घेतले.

Tuesday, July 29, 2014

पंढरपूरच्या समितीकडून नांदेड विकासाची पाहणी


नांदेड, दि.28: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या नियोजनासाठी नांदेडमध्ये दाखल झालेल्या पंढरपुर देवस्थान विकास प्राधिकरण समितीच्या पथकाने मंगळवारी (दि.29) नांदेड शहरातील विविध विकास प्रकल्पाची पाहणी केली.

पथकाने नदीघाट विकास आणि सुशोभिकरण, अम्पी थियटर, अबचलनगर पुनर्वसित प्रकल्प, बोंढार येथील मलशुध्दीकरण केंद्र, श्रावस्तीनगर येथे विस्थापित कुटुंबांना बीएसयुपी प्रकल्पात बहुमजली इमारत बांधून केलेले त्यांचे पुनर्वसन, गोविंद बाग अशा विविध कामांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, उपअभियंता प्रकाश कांबळे, आयएलएफ़एसचे नरेश वर्मा, वाय. एन. कदम, शारदा कन्स्ट्रक्शनचे चौधरी यांनी विविध प्रकल्पाची माहिती दिली.

पंढरपूरमध्ये प्रत्येक एकादशीला येणारे हजारो भाविक आणि आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला येणा-या लाखो भाविकांना तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी केलेल्या सूचनेनुसार ही समिती देशात हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि नांदेड या चार शहराला भेटी देणार आहे. पंढरपुर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने 512 कोटी रुपयांचा निधी दिला असून जसजशी गरज भासेल तसतसा आणखी निधी मिळणार असल्याचे पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोरे, सोलापूरच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक पाटील, सल्लागार शरद मोहिते यांच्या समितीने प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर प्रत्येक कामाबद्दल कौतुक केले. अत्यंत कमी वेळेत प्रशासनाला कौशल्यपुर्वक कामे करता आली. राज्य आणि केंद्र सरकार पाठीशी असणे, विकासकामात नागरिकांचा सहभाग, राजकीय इच्छा शक्ती आणि प्रशासकीय गतिमानता अशा सर्व बाबी एकदाच जुळून आल्यामुळे नांदेड मध्ये अद्वितीय विकासकामे होऊ शकली, असा अभिप्राय समितीने यावेळी नोंदवला.

Monday, July 28, 2014

पंढरपूरच्या पथकाची नांदेड महापालिकेस भेट


नांदेड, दि.28: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या नियोजनासाठी पंढरपूर देवस्थान विकास प्राधिकरण समितीच्या पथकाने सोमवारी (दि.28) नांदेड महापालिकेस भेट देऊन गुरु ता गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त आणि जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेतंर्गत केलेल्या कामांच्या नियोजनाची माहिती घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने पंढरपूर संस्थानच्य प्रमुखपदी सरकारचा प्रतिनिधी नेमला असल्याने तेथील बडव्यांचा हस्तक्षेप आता बंद झाला आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीनिमित्त तेथील विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या असल्याने तीर्थक्षेत्र विकासाची पार्श्वभूमी असलेली शहरे कशी विकसीत झाली आणि सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने दाखल होणा-या भाविकांना सर्व सुविधा कोणत्या पध्दतीने पुरविल्या जातात, याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नांदेडमध्ये दाखल झाली आहे.
पंढरपूरमध्ये प्रत्येक एकादशीला येणारे हजारो भाविक आणि आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला येणा-या लाखो भाविकांना तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करावयाचा असल्याने सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी केलेल्या सूचनेनुसार ही समिती देशात हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि नांदेड या चार शहराला भेटी देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समितीने सोमवारी दुपारी सचखंड गुरुद्वारा येथे मत्था टेकून त्या परिसरातील विकासकामांची पाहणी केली. उद्या मंगळवारी (दि.29) ही समिती शहरातील विविध प्रकल्प तसेच विकासकामांची पाहणी करणार आहे.

सदर पथकात पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोरे, सोलापूरच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक पाटील, सल्लागार शरद मोहिते यांचा समावेश आहे. उपायुक्त (विकास) रत्नाकर वाघमारे यांनी सादरीकरणाद्वारे 2008 पुर्वीचे आणि नियोजनबध्द पध्दतीने नंतर कायापालट झालेले नांदेड याची सचित्र आणि गुगल नकाशाद्वारे माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रभारी आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, उपायुक्त राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, नायब तहसीलदार बंग, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, आयएलएफ़एसचे डी. के. सिंग, नरेंद्र वर्मा आदी उपस्थित होते.