Monday, July 28, 2014

पंढरपूरच्या पथकाची नांदेड महापालिकेस भेट


नांदेड, दि.28: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या नियोजनासाठी पंढरपूर देवस्थान विकास प्राधिकरण समितीच्या पथकाने सोमवारी (दि.28) नांदेड महापालिकेस भेट देऊन गुरु ता गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त आणि जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेतंर्गत केलेल्या कामांच्या नियोजनाची माहिती घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने पंढरपूर संस्थानच्य प्रमुखपदी सरकारचा प्रतिनिधी नेमला असल्याने तेथील बडव्यांचा हस्तक्षेप आता बंद झाला आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीनिमित्त तेथील विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या असल्याने तीर्थक्षेत्र विकासाची पार्श्वभूमी असलेली शहरे कशी विकसीत झाली आणि सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने दाखल होणा-या भाविकांना सर्व सुविधा कोणत्या पध्दतीने पुरविल्या जातात, याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नांदेडमध्ये दाखल झाली आहे.
पंढरपूरमध्ये प्रत्येक एकादशीला येणारे हजारो भाविक आणि आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला येणा-या लाखो भाविकांना तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करावयाचा असल्याने सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी केलेल्या सूचनेनुसार ही समिती देशात हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि नांदेड या चार शहराला भेटी देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समितीने सोमवारी दुपारी सचखंड गुरुद्वारा येथे मत्था टेकून त्या परिसरातील विकासकामांची पाहणी केली. उद्या मंगळवारी (दि.29) ही समिती शहरातील विविध प्रकल्प तसेच विकासकामांची पाहणी करणार आहे.

सदर पथकात पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोरे, सोलापूरच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक पाटील, सल्लागार शरद मोहिते यांचा समावेश आहे. उपायुक्त (विकास) रत्नाकर वाघमारे यांनी सादरीकरणाद्वारे 2008 पुर्वीचे आणि नियोजनबध्द पध्दतीने नंतर कायापालट झालेले नांदेड याची सचित्र आणि गुगल नकाशाद्वारे माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रभारी आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, उपायुक्त राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, नायब तहसीलदार बंग, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, आयएलएफ़एसचे डी. के. सिंग, नरेंद्र वर्मा आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment