Sunday, June 29, 2014

कैलासनगर प्रभागात 37.01टक्के मतदान


नांदेड, दि. 29: कैलासनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.29) 37.01 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 11774 पैकी 4357 मतदारांनी मतदान केले.

निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त राजेंद्र खंदारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गुलाम सादेक, शिवाजी डहाळे, गणेशराव आडेराघो, उप अभियंता शिवाजी बाबरे, सुनील देशमुख, दिलीप टाकळीकर, रमेश चवरे, राजकुमार वानखेडे, निवडणूक विभागाचे अख्तर इनामदार, महमद युनुस आदींनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत काम केले.
रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आचार संहिता भंगाची एकही तक्रार दाखल नाही. प्रभागातील 16 मतदान केंद्रावर सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. यात 37.01 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 11774 पैकी 4357 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 5995 पैकी 2388 पुरुष तर 5779 पैकी 1969 महिला मतदारांचा समावेश आहे.

16 मतदान केंद्रासाठी 18 मतदान केंद्राध्यक्ष, 100 मतदान कर्मचारी, 100 पोलिस कर्मचारी यांचा ताफा कार्यरत होता. सहायक पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक आर. ए. तासीलदार, भाग्यनगरचे पालीवाल यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

आज मतमोजणी
सोमवारी सकाळी 9 पासून स्टेडियम परिसरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेसाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली असून चार फे-या होतील. प्रत्येक टेबलवर चार मतदान यंत्रामधील मतांची मोजणी केली जाईल. सकाळी 11 चार फे-या होतील. प्रत्येक टेबलवर चार मतदान यंत्रामधील मतांची मोजणी केली जाईल. सकाळी 11 वाजेपर्यंत मतमोजणीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे

Friday, June 27, 2014

कागदपत्रांसह खात्री पटल्यानंतरच जन्म-मृत्यु नोंदीत सुधारणेचा विचार

प्रमाणपत्रास विलंब नको, पण छाननी काळजीपुर्वक करा

कागदपत्रांसह खात्री पटल्यानंतरच
जन्म-मृत्यु नोंदीत सुधारणेचा विचार
आरोग्य विभागातील कामकाज तपासणीत आयुक्तांच्या सूचना

नांदेड, दि.27: महापालिकेच्या आरोग्य विभागात जन्म-मृत्यु प्रमाणपत्र देण्यात विलंब होत असल्याची तक्रार महापौरांसह विविध पदाधिकारी व नगरसेवकांनी काल गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केल्यानंतर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज शुक्रवारी (दि.27) आरोग्य विभागात जवळपास चार तास तळ ठोकून तेथील सर्व प्रक्रियेची छाननी करीत प्रलंबित राहणा-या अर्जांच्या कारणांची माहिती घेतली. जन्म-मृत्युच्या कोणत्या नोंदीत सुधारणा करण्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक असतात, याची माहिती सर्वसामान्यांना सुटसुटीत स्वरुपात उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना आयुक्तांनी यावेळी आरोग्य विभागाला केली.
      जन्म-मृत्यु नोंदणी प्रमाणपत्रासंदर्भात पोलिसात एक गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्जदाराने दिलेल्या माहितीची खात्री केल्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी सूचना मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागाला केली होती. परंतु या प्रक्रियेमुळे नागरिकांना प्रमाणपत्र काढण्यासाठी विलंब होत असल्याचा आक्षेप नगरसेवकांनी कालच्या सभेत घेतला होता. त्यामुळे आयुक्तांनी आज दुपारी उपायुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मीरा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागातील सर्व कर्मचा-यांकडील कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित अर्जांची माहिती घेतली. यावेळी जन्म नोंदणीतील दुरुस्तीसाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांशीही आयुक्तांनी चर्चा केली.
      जन्म-मृत्यु प्रमाणपत्र हा सर्वात महत्वाचा दस्तावेज आहे. विमा हक्क, मालमत्ता हस्तांतरण अथवा अन्य विविध कामांसाठी त्याची अत्यंत आवश्यकता असते. कोट्यवधी रुपयांचे हस्तांतरणापासून व्यक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा असणा-या या प्रमाणपत्राच्या आधारे गैरप्रकार करण्यास वाव राहू नये, पूर्ण दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याकरिता जन्माचे प्रमाणपत्र प्रथमत: नेत असताना त्यांचे आई-वडील किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसल्यास त्यांचे वडील किंवा रक्ताच्या नात्यातील मंडळींनी बाळाच्या आई किंवा वडिलांचा ओळख पटणारा पुरावा दाखल करणे आवश्यक करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. जन्माच्या नोंदीची माहिती एकदा भरुन दिल्यानंतर ती महापालिकेतील उपलब्ध तपशीलाशी जुळते किंवा कशी याचे बारकाईने निरिक्षण करुन अर्जदाराने जोडलेली कागदपत्रे व तपशीलाची खात्री करुन घ्यावी. एकदा दिलेली माहिती पुन्हा बदलता येणार नाही. बाळाचे नाव बदलायचे झाल्यास कुटुंबातील जबाबदार सदस्य किंवा पालकाने त्याबाबत इतर शासकीय कागदपत्रे सादर केल्यास आणि त्याची खात्री पटत असेल तरच मूळ नावाला आब्लीक करुन एकदाच पर्यायी नाव नोंदवून घ्यावे. परंतु ही सर्व प्रक्रिया खात्री पटल्याशिवाय करु नये अन्यथा संबधित निबंधकाला जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना दिला.
कशी करता येईल मूळ नोंदीत दुरुस्ती?
उच्चार किंवा इंग्रजी स्पेलिंगमध्ये किरकोळ लेखन दोष असतील तर अर्जदाराच्या अर्जानुसार कालमर्यादेत सुधारित करावेत. उपलब्ध नोंदीत बाळाचे नाव (असल्यास), वडीलांचे नाव, आईचे नाव, आडनाव, लिंग, जन्म दिनांक (एकच दिवसाचा अपवाद), पत्ता यापैकी एखादा तपशील बदलून मागण्यात येत असेल तर अर्जदाराकडून त्याचे समर्थन करणारे खात्रीयोग्य पुरावे मागवून पुढील निर्णय घेतला जाईल. जन्माची नोंद शोधताना संगणकप्रणालीच्या सर्व पध्दतीने शोध घेऊन हस्तलिखीत नोंददेखील उपलब्ध आहे का, याची बारकाईने तपासणी केल्याशिवाय अनुपब्लता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशाही सूचना आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावेळी केल्या.
बॉन्ड पेपरवर शपथपत्र नको
बॉन्ड पेपरवर शपथपत्र घेण्याची गरज नाही. त्याऐवजी साध्या कागदावर नोटरीकडून प्रमाणित करुन घ्यावे. म्हणजे नागरिकांना विनाकारण भुर्दंड पडणार नाही. जन्माची नोंद शोधण्यासाठी कायद्यातील तरतुदीत विहित केल्याप्रमाणे आवश्यक ते शुल्क आकारण्यात येत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी असे शुल्क आकारण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करुन रक्कम मनपा फ़ंडात जमा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नोंदणीत दुरुस्तीचे अधिकार रुग्णालयांना नाहीत

      जन्माचे स्थळ असलेल्या कोणत्याही रुग्णालय किंवा स्थानिक संस्थेस जन्माच्या नोंदीत दुरुस्तीचे अधिकार नाहीत तसेच कोणीही असे प्रमाणित करुन दिल्यास त्याआधारे नोंद दुरुस्त केली जात नाही. त्याकरिता नागरिकांनी जन्म किंवा मृत्यु नोंदणीत रुग्णालयांकडून दुरुस्तीची कागदपत्रे काढण्यात आपला वेळ, श्रम आणि लागत असेल तर पैसा वाया घालू नये. जी दुरुस्ती करावयाची आहे, त्याबाबत सुटसुटीत नियमावली निश्चित करुन ती जाहीर करावी, असे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले.

Thursday, June 26, 2014

शिवाजीनगर जनता मार्केट तात्काळ रिकामे करा: आयुक्त





सेकंड ओपिनियनमध्येही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल 

पुनर्वसन प्रस्तावास गाळेधारकांची संमती

नांदेड, दि.26: शिवाजीनगर जनता मार्केटची इमारत धोकादायक असल्याने तात्काळ पाडावी, असा अहवाल औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिला असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी गाळेधारकांनी आपला व्यवसाय स्थलांतरित करुन संकुल तात्काळ रिकामे करावे, अशी सूचना मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (दि.25) गाळेधारकांसोबत आयोजित बैठकीत केली.

जनता मार्केट संकुलातील व्यापा-यांनी तात्काळ आपले स्थलांतर करावे. संबधित गाळेधारकांना त्यांच्या व्यवसायासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करुन दिली जाईल आणि महापालिकेच्या वतीनेच सदर संकुल नव्याने उभारुन गाळेधारकांच्या सहभागाने पुनर्वसनाची योजना तयार केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

जनता मार्केट इमारतीच्या सुरक्षिततेसंबधात औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या संरचनात्मक तपासणीचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला असून त्याची माहिती देण्यासाठी या व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांची मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.25) सायंकाळी बैठक झाली. त्यात सर्व गाळेधारकांनी पुनर्वसन प्रस्तावाबाबत आपली मते व्यक्त करुन आयुक्तांनी सादर केलेल्या पुनर्वसन प्रस्तावात आपली तत्वत: संमती दर्शवली. बैठकीस कार्यकारी अभियंता गिरीश कदम, मालमत्ता व्यवस्थापक गुलाम सादेक, चंद्रकांत अंकमवार, उप अभियंता दिलीप टाकळीकर आदी उपस्थित होते.

शिवाजीनगर जनता मार्केट पाडल्यानंतर बीओटी तत्वावर इमारत उभी करण्याचा महापालिकेचा कोणताही इरादा नाही. या जागेत महापालिकेच्याच वतीने आधुनिक सुविधेसह नवीन भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. नव्या संकुलात पुर्वीच्या गाळेधारकांना पुन्हा नव्याने जागा दिली जाईल. एकही गाळेधारक यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असा दिलासा यावेळी आयुक्तांनी दिला.

नव्या संकुलासाठी लागणा-या खर्चाचा भार गाळेधारकांना उचलावा लागेल. गाळेधारकांना दुकान सोडायचे झाल्यास दिलेली मूळ अनामत परत करणे, 30 वर्षाचा करार करणे, गाळा विकण्याचे हक्क धारकास देऊन त्यातून आलेली 25 टक्के रक्कम मनपाकडे हस्तांतरीत करणे अशा विविध पर्याय व सूचनेबाबत या बैठकीत साधकबाधक चर्चा झाली. चर्चेअंती आयुक्तांनी ठेवलेल्या सर्व प्रस्तावांचे गाळेधारक संघटनेचे प्रतिनिधी गुणवंत पाटील हंगरगेकर, श्री. पाटील, नरेश दंडवते, शेख मौला व इतरांनी स्वागत करीत गाळेधारकांचे हित जोपासण्याचा प्रस्ताव समोर आणल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले. या विषयात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या पदाधिका-यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

अशी आहे पार्श्वभूमी
यापुर्वी स्थानिक स्ट्रक्चरल अभियंता यांनी जनता मार्केटच्या इमारतीची पाहणी करुन ती धोकादायक असल्याचा आणि तात्काळ पाडण्याची आवश्यकता असल्याचा अभिप्राय दिला होता. त्यानुसार मनपाने सर्व गाळेधारकांना दुकाने रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांसह इतर लोकप्रतिनिधींना केलेल्या विनंतीनुसार या इमारतीच्या संरचनात्मक तपासणीचे सेकंड ओपिनियन घेण्यासाठी औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला कळविण्यात आले होते. या महाविद्यालयाच्या समितीने दीड महिन्यापुर्वी नांदेडमध्ये येऊन जनता मार्केटच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर आपला अहवाल आयुक्तांकडे नुकताच सोपवला. या अहवालात सदर इमारत ही मोडकळीस आल्याने कधीही कोसळू शकते. त्याकरिता त्याचे बांधकाम काढून घेणे योग्य ठरणार असल्याचे म्हटले आहे. आयुक्तांनी या अहवालाची माहिती देण्यासाठी तसेच गाळे रिकामे करण्याचे आवाहन करण्यासाठी बुधवारी ही बैठक बोलावली होती.

Wednesday, June 25, 2014

महापालिकेत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन


नांदेड, दि.26: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.26) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

      या कार्यक्रमास उपमहापौर आनंद चव्हाण, उपायुक्त विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी पी. पी. बंकलवाड, सहायक आयुक्त अविनाश अटकोरे, प्र. उप अभियंता (यांत्रिकी) राजकुमार वानखेडे, कुमार कुलकर्णी यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. महापौर अब्दुल सत्तार यांनी यावेळी शाहू जयंती आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या.
 

मुलभूत सेवा सक्षमीकरणासाठी चौथा वित्त आयोग महापालिकेच्या पाठीशी: डांगे




       नांदेड, दि.25: महसुली उत्पन्न आणि मूलभूत सुविधांसह त्याच्या देखभालीसाठी लागणारा खर्च तसेच नागरिकांची देय क्षमता आणि गरजेची तुलना करुन लागणा-या आर्थिक मदतीची नांदेड महापालिकेने मागणी नोंदवावी. महापालिकेच्या मागण्या विचारात घेऊन योग्य त्या समर्थनासह शासनाकडे मदतीची शिफ़ारस करु, अशी ग्वाही चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी बुधवारी (दि.25) महापालिकेत आयोजित विभागप्रमुखांच्या बैठकीत दिली.
      श्री. डांगे यांनी दुपारी 3 वाजता आयुक्तांच्या बैठक दालनात सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधला. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी त्यांचे स्वागत केले. महापालिकांच्या स्तरावरील विविध प्रकारच्या 18 सेवांच्या संबधी उत्पन्न, खर्च, शासन व इतर माध्यमातून मिळणारे अनुदान आणि फ़रकाची तूट याची माहिती नमुना 12 मध्ये देण्याचे सूचित केले. इतर भागातून महानगरात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर होणा-या नागरिकांना सेवा देताना त्यांच्याकडून कोणतेही उत्पन्न नसेल तर त्याबाबत शासनाकडे मदतीची मागणी करावी, असेही डांगे यांनी यावेळी सुचविले.
महापालिकेतील आर्थिक, कामकाजातील वैधानिक अडचणी, महापलिका कायद्यात आवश्यकता वाटणारी सुधारणा, किचकट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी करता येणारी कार्यपध्दती, अर्थसंकल्पातील तूट भरुन काढण्यासाठी योग्य प्रस्ताव, कर्जाचे हप्ते सुलभ करणे आदी बाबींसंबधी मुद्देनिहाय विश्लेषण करुन पुढच्या पाच वर्षात महापालिकेला लागणारी आर्थिक मदत, अधिकार व यंत्रणेची गरज याची सविस्तर माहिती सर्वसाधारण सभेपुढे ठेवून आयोगाकडे पाठवावी, अशी सूचनाही डांगे यांनी यावेळी केली.
      मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी महापालिकेला नागरी सुविधा पुरविताना येणा-या विविध अडचणी विशद केल्या. महापालिका आणि शासनस्तरावरील विविध नियम, कायद्यात सुधारणा करणे, महापालिकेस आणि आयुक्तांना जादा अधिकार प्रदान करणे, अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे, मनपास कमी व्याजदराचे कर्ज देऊन सुलभ हप्ते निर्माण करणे, व्हॅट, करमणूक, अकृषिक, मुद्रांक, परिवहन तसेच अन्य ज्या घटकांशी संबधित महसूली कर मनपा क्षेत्रातून कर वसुल केला जातो, त्याचा पूर्ण किंवा किमान जादा वाटा मनपास द्यावा, महापालिका सेवांना नि:शुल्क पोलिस संरक्षण पुरवावे, महापालिकेत आयुक्तांप्रमाणे इतर प्राधिकरणांनाही जबाबदार घटक मानण्यात यावे, अशा विविध मागण्या केल्या.

उपायुक्त राजेंद्र खंदारे यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य व वित्त लेखाधिकारी बैंनवाड, मनपा उपायुक्त विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी पी. पी. बंकलवाड, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, सहाय्यक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, सुग्रीव अंधारे, शैलेंद्र जाधव आदी उपस्थित होते.    

Tuesday, June 24, 2014

जे. पी. डांगे यांच्या उपस्थितीत आज महापालिकेत बैठक



नांदेड, दि.24: चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे हे उद्या बुधवारी (दि.25) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस भेट देणार असून दुपारी 3 वाजता मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
श्री. डांगे यांनी यापुर्वी दि. 15 फ़ेब्रुवारी 2013 रोजी महापालिकेस भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेतील आर्थिक, कामकाजातील वैधानिक अडचणी, महापलिका कायद्यात आवश्यकता वाटणारी सुधारणा, किचकट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी करता येणारी कार्यपध्दती, अर्थसंकल्पातील तूट भरुन काढण्यासाठी योग्य प्रस्ताव, कर्जाचे हप्ते सुलभ करणे आदी बाबींसंबधी मुद्देनिहाय विश्लेषण करुन महापालिकेला लागणारी आर्थिक मदत, अधिकार व यंत्रणेची गरज आदी माहिती महापालिकेच्या वतीने त्यांच्या कार्यालयात पाठविण्यात आली होती.

उद्या त्यांच्या उपस्थितीत होणा-या बैठकीत महापालिकेच्या वतीने पुरविल्या जाणा-या विविध सेवाची स्थिती, त्याच्या देखभालीवर होणारा खर्च, उत्पन्न आणि खर्च यात निर्माण होणारी तूट, मंजुरीपासून सुरु करण्यापर्यंतच्या कालावधीत विकासकामांचा खर्च आणि मनपास त्यामुळे येणा-या अडचणी तसेच महापालिकेच्या आर्थिक विषयाशी निगडीत विविध माहितीचे सादरीकरण करुन विकासकामे आणि मनुष्यबळ विकासासाठी लागणा-या आवश्यक यंत्रणा व संसाधनासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे मनपाच्याही सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन, भत्ते, सेवानिवृत्तांचे वेतन तसेच इतर लाभाचे दायित्व शासनाने उचलावे, असाही आग्रहही यावेळी त्यांच्याकडे धरला जाणार आहे.    

मनपा स्थायी समितीची सभा पुढे ढकलली

नांदेड, दि.24: अर्थसंकल्प तसेच विषयपत्रिकेवरील विविध विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (दि.24) आयोजित करण्यात आलेल्या महापालिका स्थायी समितीच्या दोन सभा अधिका-यांची कमी उपस्थिती असल्याच्या कारणावरुन पुढे ढकलण्यात येत असल्याचे सभापतीं उमेश पवळे यांनी सांगितले
स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात सकाळी 11 वाजता स्थायी समितीच्या सभेला सुरुवात झाली. यावेळी सदस्य स. सरजितसिंघ गील, गफ़ार खान, शंकर गाडगे, श्रध्दा चव्हाण, मोहिनी कनकदंडे तसेच प्रशासनाच्या वतीने नगरसचिव पी. पी. बंकलवाड, उपायुक्त विद्या गायकवाड,  नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, शैलेंद्र जाधव यांच्यासह मनपाचे अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबदल तसेच हिमाचल प्रदेश येथील दुर्घटनेत अभियांत्रिकीच्या 22 विद्यार्थ्यांना जलसमाधी मिळाल्यामुळे त्यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. सभागृहात अधिका-यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे तसेच काही सदस्यही आज उपस्थित राहू शकले नाहीत. सर्वांना अर्थसंकल्पासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा करावयाची असल्याने आजची बैठक पुढे ढकलण्यात यावी, असा प्रस्ताव गफ़ार खान यांनी मांडला. गील व गाडगे यांनी त्यांना अनुमोदन दिले. सर्वांशी चर्चा करुन बैठकीची तारीख नंतर कळविण्यात येईल, असे सांगून सभापतींनी आजची बैठक स्थगित केल्याचे जाहीर केले.

महापालिकेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व रंगीत तालीम










नांदेड, दि.24: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये आपातकालीन परिस्थितीतील शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण तसेच रंगीत तालीम घेण्याचा कार्यक्रम सुरु आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील 10  प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात आलेली असून यात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्याच्या नागरी क्षेत्रासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या सूचनेवरुन तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या या विभागाने जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत कार्यरत असणा-या सर्व घटकांना शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करुन घेतली. याआधी हिंगोली व परभणी मुख्यालयी अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आला असून लवकरच संबधित जिल्ह्याच्या नगरपालिका क्षेत्रातही प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार, उमरी, भोकर, मुखेड, देगलूर, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, बिलोली (कुंडलवाडी) व किनवट नगरपालिकेच्या प्रांगणात प्रशिक्षण व रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी संबधित तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, महसूल तसेच नगरपालिकांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबधित व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

उद्या बुधवारी (दि. 25) माहूर, दि. 26 रोजी धर्माबाद आणि दि. 27 रोजी लोहा येथे प्रशिक्षण व रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात प्रथमच असा कार्यक्रम होत असल्याने पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजनेची माहिती यावेळी नागरिकांनाही दिली जात असल्याने त्याचा संबधित भागातील लोकांना चांगला लाभ होईल, असा विश्वास मनपा उपायुक्त राजेंद्र खंदारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फ़रतुल्ला बेग यांनी व्यक्त केला.