सेकंड ओपिनियनमध्येही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल
पुनर्वसन प्रस्तावास गाळेधारकांची संमती
नांदेड, दि.26: शिवाजीनगर जनता मार्केटची इमारत धोकादायक असल्याने तात्काळ पाडावी, असा अहवाल औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिला असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी गाळेधारकांनी आपला व्यवसाय स्थलांतरित करुन संकुल तात्काळ रिकामे करावे, अशी सूचना मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (दि.25) गाळेधारकांसोबत आयोजित बैठकीत केली.
जनता मार्केट संकुलातील व्यापा-यांनी तात्काळ आपले स्थलांतर करावे. संबधित गाळेधारकांना त्यांच्या व्यवसायासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करुन दिली जाईल आणि महापालिकेच्या वतीनेच सदर संकुल नव्याने उभारुन गाळेधारकांच्या सहभागाने पुनर्वसनाची योजना तयार केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
जनता मार्केट इमारतीच्या सुरक्षिततेसंबधात औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या संरचनात्मक तपासणीचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला असून त्याची माहिती देण्यासाठी या व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांची मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.25) सायंकाळी बैठक झाली. त्यात सर्व गाळेधारकांनी पुनर्वसन प्रस्तावाबाबत आपली मते व्यक्त करुन आयुक्तांनी सादर केलेल्या पुनर्वसन प्रस्तावात आपली तत्वत: संमती दर्शवली. बैठकीस कार्यकारी अभियंता गिरीश कदम, मालमत्ता व्यवस्थापक गुलाम सादेक, चंद्रकांत अंकमवार, उप अभियंता दिलीप टाकळीकर आदी उपस्थित होते.
शिवाजीनगर जनता मार्केट पाडल्यानंतर बीओटी तत्वावर इमारत उभी करण्याचा महापालिकेचा कोणताही इरादा नाही. या जागेत महापालिकेच्याच वतीने आधुनिक सुविधेसह नवीन भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. नव्या संकुलात पुर्वीच्या गाळेधारकांना पुन्हा नव्याने जागा दिली जाईल. एकही गाळेधारक यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असा दिलासा यावेळी आयुक्तांनी दिला.
नव्या संकुलासाठी लागणा-या खर्चाचा भार गाळेधारकांना उचलावा लागेल. गाळेधारकांना दुकान सोडायचे झाल्यास दिलेली मूळ अनामत परत करणे, 30 वर्षाचा करार करणे, गाळा विकण्याचे हक्क धारकास देऊन त्यातून आलेली 25 टक्के रक्कम मनपाकडे हस्तांतरीत करणे अशा विविध पर्याय व सूचनेबाबत या बैठकीत साधकबाधक चर्चा झाली. चर्चेअंती आयुक्तांनी ठेवलेल्या सर्व प्रस्तावांचे गाळेधारक संघटनेचे प्रतिनिधी गुणवंत पाटील हंगरगेकर, श्री. पाटील, नरेश दंडवते, शेख मौला व इतरांनी स्वागत करीत गाळेधारकांचे हित जोपासण्याचा प्रस्ताव समोर आणल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले. या विषयात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या पदाधिका-यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
अशी आहे पार्श्वभूमी
यापुर्वी स्थानिक स्ट्रक्चरल अभियंता यांनी जनता मार्केटच्या इमारतीची पाहणी करुन ती धोकादायक असल्याचा आणि तात्काळ पाडण्याची आवश्यकता असल्याचा अभिप्राय दिला होता. त्यानुसार मनपाने सर्व गाळेधारकांना दुकाने रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांसह इतर लोकप्रतिनिधींना केलेल्या विनंतीनुसार या इमारतीच्या संरचनात्मक तपासणीचे सेकंड ओपिनियन घेण्यासाठी औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला कळविण्यात आले होते. या महाविद्यालयाच्या समितीने दीड महिन्यापुर्वी नांदेडमध्ये येऊन जनता मार्केटच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर आपला अहवाल आयुक्तांकडे नुकताच सोपवला. या अहवालात सदर इमारत ही मोडकळीस आल्याने कधीही कोसळू शकते. त्याकरिता त्याचे बांधकाम काढून घेणे योग्य ठरणार असल्याचे म्हटले आहे. आयुक्तांनी या अहवालाची माहिती देण्यासाठी तसेच गाळे रिकामे करण्याचे आवाहन करण्यासाठी बुधवारी ही बैठक बोलावली होती.
No comments:
Post a Comment