नांदेड, दि.24: चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी.
डांगे हे उद्या बुधवारी (दि.25) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस भेट देणार असून दुपारी
3 वाजता मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची
त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
श्री. डांगे यांनी यापुर्वी दि. 15 फ़ेब्रुवारी 2013
रोजी महापालिकेस भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेतील आर्थिक, कामकाजातील वैधानिक अडचणी,
महापलिका कायद्यात आवश्यकता वाटणारी सुधारणा, किचकट
प्रक्रिया सुलभ करण्यासाठी करता येणारी कार्यपध्दती, अर्थसंकल्पातील
तूट भरुन काढण्यासाठी योग्य प्रस्ताव, कर्जाचे हप्ते सुलभ करणे
आदी बाबींसंबधी मुद्देनिहाय विश्लेषण करुन महापालिकेला लागणारी आर्थिक मदत,
अधिकार व यंत्रणेची गरज आदी माहिती महापालिकेच्या वतीने त्यांच्या
कार्यालयात पाठविण्यात आली होती.
उद्या त्यांच्या उपस्थितीत होणा-या बैठकीत महापालिकेच्या वतीने पुरविल्या
जाणा-या विविध सेवाची स्थिती, त्याच्या देखभालीवर होणारा खर्च, उत्पन्न आणि खर्च
यात निर्माण होणारी तूट, मंजुरीपासून सुरु करण्यापर्यंतच्या कालावधीत विकासकामांचा
खर्च आणि मनपास त्यामुळे येणा-या अडचणी तसेच महापालिकेच्या आर्थिक विषयाशी निगडीत विविध
माहितीचे सादरीकरण करुन विकासकामे आणि मनुष्यबळ विकासासाठी लागणा-या आवश्यक यंत्रणा
व संसाधनासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व नगरपालिका या
स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे मनपाच्याही सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन,
भत्ते, सेवानिवृत्तांचे वेतन तसेच इतर लाभाचे दायित्व शासनाने उचलावे, असाही आग्रहही
यावेळी त्यांच्याकडे धरला जाणार आहे.
No comments:
Post a Comment