नांदेड, दि.24: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व
नगरपंचायतींमध्ये आपातकालीन परिस्थितीतील शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण तसेच
रंगीत तालीम घेण्याचा कार्यक्रम सुरु आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील 10 प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन
करण्यात आलेली असून यात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस नांदेड, परभणी व हिंगोली
या तीन जिल्ह्याच्या नागरी क्षेत्रासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा
दर्जा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या सूचनेवरुन तसेच मनपा
आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या या विभागाने
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रातील आपत्ती
व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत कार्यरत असणा-या सर्व घटकांना शोध व बचाव कार्याचे
प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करुन घेतली. याआधी
हिंगोली व परभणी मुख्यालयी अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आला असून लवकरच संबधित
जिल्ह्याच्या नगरपालिका क्षेत्रातही प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार, उमरी, भोकर, मुखेड,
देगलूर, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, बिलोली (कुंडलवाडी) व किनवट नगरपालिकेच्या
प्रांगणात प्रशिक्षण व रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी संबधित तालुक्याचे
तहसीलदार, नायब तहसीलदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, महसूल तसेच नगरपालिकांचे
कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबधित व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी व
नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
उद्या बुधवारी (दि. 25) माहूर, दि. 26 रोजी धर्माबाद
आणि दि. 27 रोजी लोहा येथे प्रशिक्षण व रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.
नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात प्रथमच असा कार्यक्रम होत असल्याने पाहण्यासाठी
नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजनेची माहिती यावेळी
नागरिकांनाही दिली जात असल्याने त्याचा संबधित भागातील लोकांना चांगला लाभ होईल, असा
विश्वास मनपा उपायुक्त राजेंद्र खंदारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा
फ़रतुल्ला बेग यांनी व्यक्त केला.
good
ReplyDeleteSuper work Govind sir
ReplyDeletegood work sir keep on better service for better nanded
ReplyDelete