Saturday, July 19, 2014

सिडको क्षेत्रिय कार्यालय व अधिका-यावरील हल्ल्याचा मनपा सर्वसाधारण सभेने नोंदवला निषेध


महापालिका कर्मचा-यांचे काळ्या फ़िती लावून आंदोलन
नांदेड, दि.19: सिडको क्षेत्रिय कार्यालयावर झालेली दगडफ़ेक आणि तेथील सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शनिवारी (दि.19) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने निषेध नोंदवण्यात आला. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी शनिवारी (दि.19) काळ्या फ़िती लावून काम करीत आपला निषेध नोंदवला.
      सिडको येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत अनाधिकृतपणे सुरु असलेल्या कोचिंग क्लासेसला सील ठोकल्याच्या कारणावरुन काही लोकांनी सिडको क्षेत्रिय कार्यालयात जमावासह येऊन सहायक आयुक्त गुलाम सादेख यांना जबर मारहाण करुन कार्यायावर दगडफ़ेक केली. हल्लेखोरांनी सादेख यांच्या कक्षातील काच व फ़र्निचरची नासधूस करुन दहशत निर्माण केली. या घटनेप्रकरणी काल शुक्रवारी (दि.18) दुपारी दोनपासून कार्यालयीन वेळ संपेपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करुन महापौर अब्दुल सत्तार व मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
      या घटनेची शनिवारी झालेया सर्वसाधारण सभेनेही दखल घेतली. विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, नगरसेवक रामनारायण काबरा आणि विनय गिरडे यांनी या विषयाकडे आयुक्तांचे लक्ष वेधून घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर सदर घटनेत महापालिकेच्या अधिका-यांचीही चूक असेल तर चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर उपस्थित सर्व नगरसेवकांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.

      सदर घटनेच्या व हल्लेखोरांच्या चिथावणीवरुन सादेख यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शनिवारी महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयासह विविध विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी काळ्या फ़िती लावून आपला आक्षेप नोंदवला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही आयुक्तांसह सर्व अधिकारी व विभागप्रमुखांनी काळ्या फ़िती लावूनच कामकाज केले.

मनपाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा: आयुक्त


नांदेड, दि.19: सिडको क्षेत्रिय कार्यालयावर शुक्रवारी झालेल्या दगडफ़ेकीच्या घटनेमुळे यापुढे सर्व क्षेत्रिय कार्यालये तसेच नागरिकांशी नित्य संबध येणा-या मनपाच्या विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संभाव्य घटनेस प्रतिबंध करण्याची पूर्वतयारी करावी, अशी सूचना मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी शनिवारी (दि.19) सामान्य प्रशासन विभागाला केली.
सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर उपस्थित होऊ शकणा-या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित विभागप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, डॉ. विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी पी. पी. बंकलवाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्त आणि विविध विभागप्रमुख उपस्थित होते. 
महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालय आणि अधिका-यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत दु:खद असून हल्लेखोरांच्या वतीने काही लोकांनी खोटी तक्रार करुन गुन्हा नोंदवण्यास भाग पाडल्याचे कळाल्यानंतर आपण पोलिस अधिक्षकांशी चर्चा केली आहे. जमाव पांगवण्याच्या उद्देशाने कदाचित प्रतितक्रार स्विकारुन पोलिसांनी असे केले असावे. कर्तव्य बजावताना महापालिका अधिकारी व कर्मचा-यांनी खचून जाऊ नये. प्रशासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात आयुक्तांनी सर्वांना आश्वस्थ केले.
मुलभूत सुविधा पुरवताना महापालिकेस अनेकदा अप्रिय कारवाई करावी लागते. अशा प्रसंगी सर्व क्षेत्रिय कार्यालय, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभाग, बीएसयुपी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध सेवा पुरविणा-या विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसविण्यात यावेत, अशी सूचना उपायुक्त विद्या गायकवाड यांना केली. कर्तव्य बजावताना कोणीही दबाबतंत्राचा वापर करुन अडथळा आणण्याची शक्यता असल्यास  मला तात्काळ कळवावे. त्यातून संबधितांवर कसे नियंत्रण आणता येईल, याचा निर्णय घेता येईल. आक्षेपकर्त्यांसोबत वादाचे प्रसंग टाळून सौम्य भाषेत संभाषण करुन त्यांना माझ्याकडे किंवा अप्पर आयुक्तांकडे पाठवावे. संबधितांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

           

Friday, July 18, 2014

इतवारा हद्दीत हातगाड्यांना शिस्त लावण्यासाठी विशेष पथक

इतवारा हद्दीत हातगाड्यांना शिस्त लावण्यासाठी विशेष पथक

नांदेड, दि.16: रमजान महिन्यात इतवारा भागात साहित्य खरेदीसाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता पोलिस अधिका-यांच्या विनंतीवरुन महापालिकेने त्या भागातील हातगाड्यांना शिस्त लावण्यासाठी दोन विशेष संयुक्त पथकाची स्थापना केली आहे.
       हबीब टॉकीज- बर्की चौक - मन्नीयार गल्ली-देगलूर नाका या परिसरात हातगाडेचालक रस्त्यावर उभे राहून वाहतूक व पादचारी मार्गावर अडथळा निर्माण करीत असतात. त्याकरिता वाहतूक व रहदारी व्यवस्थेत पोलिसांच्या मदतीसाठी मन्नीयार गल्ली हबीब टॉकीजचौकासाठी झोन क्रमांक 3 चे नगर निरिक्षक मिलिंद पेकमवार आणि देगलूर नाका परिसरासाठी इमारत निरिक्षक अशपाक अली खान यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दहा जणांचे संयुक्त विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक दि. 14 ते 30 जुलै 2014 या कालावधीत दुपारी 2 ते रात्री 10 दरम्यान संबधित परिसरात कार्यरत राहणार असून इतवाराचे सहायक पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. सदर पथकावर झोन क्र. 3 (इतवारा) चे सहायक आयुक्त यांचे नियंत्रण राहील.

                                                     


व्यापारी प्रतिष्ठांनाना एलबीटी विवरणपत्रे दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत संधी

व्यापारी प्रतिष्ठांनाना एलबीटी विवरणपत्रे
दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत संधी
नांदेड, दि.18: स्थानिक संस्था कर नियम 2010 नुसार मनपा क्षेत्रातील व्यापा-यांनी त्यांची वार्षिक विवरणपत्रे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. नोटीस देऊनही ज्या व्यापा-यांनी आपली विवरणपत्रे अद्याप सादर केली नाहीत, अशा व्यापा-यांना दि. 31 ऑगष्ट 2014 पर्यंत विवरणपत्रे सादर करण्यास महापालिकेने मुदतवाढ दिली आहे.
स्थानिक संस्था कर नियम 2010 मधील नियम 29 (1) अन्वये नमुना ड- एक व नमुना ड- दोन मधील नुसार सर्व व्यापा-यांनी त्यांच्या व्यापारी प्रतिष्‍ठानाची वार्षिक विवरणपत्रे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. उशिरा वार्षिक विवरणपत्रे दाखल करणा-या, व्यापारी प्रतिष्ठानांना नियम 48 (6) नुसार पाच हजार रुपयापर्यंत शास्ती लावण्याची तरतूद आहे. परंतु अद्याप देखील काही व्यापारी प्रतिष्ठानांना नोटीस देवुन देखील विवरणपत्रे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे अशा व्यापारी प्रतिष्ठानांना दि. 31 ऑगस्ट 2014 पर्यंत विवरणपत्रे सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात येत आहे. व्यापारी प्रतिष्ठानांनी ‍वार्षिक विवरणपत्रे संपूर्ण अभिलेख्यासह सादर करावीत. सदर मुदतीत जे व्यापारी प्रतिष्ठाने वार्षिक विवरणपत्रे दाखल करणार नाहीत त्यांचेविरुध्द स्थानिक संस्था कर नियम 2010 मधील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

                                                     


पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी: महापालिका


आजारांच्या लक्षणाआधीच करा प्रतिबंधात्मक उपाययोजना
नांदेड, दि.17: पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याची रोगांचा प्रतिकार करण्याची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेशी काळजी घेणे आवश्यक असून पाण्याच्या साठ्वणुकीपासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी डेंगू, चिकनगुनिया, हिवताप व इतर आजाराची लक्षणे दिसण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात घर, परिसरात तसेच रिकामी भांडी, टिनचे डबे, टायर अथवा अन्य वस्तूत पावसाचे पाणी साठू देऊ नका. घरातील पाण्याचे साठे, रां, माठ, पीप, अथवा पाण्याची टाकी यावर झाकण घट्ट ठेवावे. घराभोवती खड्डे, डबकी असल्यास मुरूम किंवा भर टाकून भरून घ्यावे. नाले, गटारे साफ करून सांडपाणी वाहते ठेवावे.
साठवण साधने दर आठवड्यास धुवा
जनावरांसाठी अथवा कपडे धुण्यासाठीचे पाण्याचे हौद, टाक्या किंवा पाणी साठवण क्षमतेची अन्य साधने दर आठवड्यास स्वच्छ धुवू, पुसून कोरडी करावी. कुलर, फुलदाणी, पाण्याची कारंजी, यातील पाणी दर आठवड्यास काढून टाकावे.
झोपताना घ्या ही काळजी
डासांच्या सवयी लक्षात घेता सायंकाळच्या वेळी घराची दारे खिडक्या बंद करून घ्यावे. खिडक्यांना जाळीदार पडदे लाऊन घेणे. झोपताना उघड्या अंगाने झोपू नका. विशेषतः  लहान बाळाची काळजी घ्या. शक्य झाल्यास मच्छरदानी, डास प्रतिबंधक मलम, धुरी अथवा अगबत्तीचा वापर करावा.
लक्षणे दिसताच डॉक्टरला तात्काळ भेटा
ताप आलेल्या व्यक्तीची डॉक्टरकडून तात्काळ तपासणी करुन घ्यावी. ही सुविधा सरकारी दवाखाने व मनपा दवाखान्यात उपलब्ध आहे. मनपा आरोग्य सेवेतील कर्मचारी व त्यांचे मदतनीस आणि जनतेचा सहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण हिवताप, डेंगू व चिकुनगुनिया या आजाराला मुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिवतापाची लक्षणे
१. या आजारात थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते.
२. ताप एकदिवसा आड किंवा दोन दिवसाआड येतो.
३. आजारात सर्व अंग दुखते, डोखे दुखते, पांघरुन घ्यावेसे वाटते. त्यानंतर घाम येउन ताप कमी होतो. आणि रुग्णास थकवा येतो.
४. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उपचार अत्यंत आवश्यक आहे. उपचार न केल्यास वारंवार ताप येतो. प्रसंगी रुग्ण बेशुद्धदेखील होऊ शकतो.
डेंगूची लक्षणे
१. या आजारात दो ते सात दिवस तीव्र ताप असतो.
२. तीव्र डोके दुखी, स्नायू दुखी व सांधे दुखी.
३. उलट्या होणे.
४. डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे.
५. अंगावर पुरळ, त्वचेखाली नाक तोंड मधून रक्त स्राव.
६. अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे.
चिकुनगुनियाची लक्षणे
१. या आजारात कमीत कमी मुदतीचा तीव्र ताप.
२. डोकेदुखी, अंगदुखी व तीव्र सांधे दुखी.
३. तीव्र सांधेदुखीमुळे माणूस वाकून जातो.
४. काही रुग्णाच्या अंगावर पुरळ आढळून येतात.
५. 15 ते 20 टक्के रुग्णामध्ये सांधे दुखी, 10 दिवस ते तीन महिन्यापर्यंत राहते.



अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन




नांदेड, दि.18: ज्येष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्युत भवन शेजारच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शुक्रवारी (दि.18) महापालिकेतर्फे उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, डॉ. विद्या गायकवाड, नगरसेवक नवल पोकर्णा, डॉ. विश्वास कदम, माजी प्रभाग सभापती महेश कनकदंडे, व्यंकटेश जिंदम, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, शिक्षणाधिकारी भागवत जोशी, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, शिवाजी डहाळे, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, प्रकाश कांबळे, पुतळा संरक्षण समितीचे भारत खडसे, जी. नागय्या आदी उपस्थित होते. मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. 

Friday, July 4, 2014

बालाप्रसाद करवा यांचे निधन


बालाप्रसाद करवा यांचे निधन
नांदेड, दि. 4:  हदगाव येथील व्यापारी बालाप्रसाद मदनलाल करवा (वय65) यांचे शुक्रवारी (दि.4) दुपारी 2 वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने हदगाव येथे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.5) सकाळी 9 वाजता हदगाव येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, हदगावचे विमा प्रतिनिधी गोपाल करवा आणि नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे प्रा. अमोल करवा यांचे ते वडील होत.