Saturday, July 19, 2014

मनपाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा: आयुक्त


नांदेड, दि.19: सिडको क्षेत्रिय कार्यालयावर शुक्रवारी झालेल्या दगडफ़ेकीच्या घटनेमुळे यापुढे सर्व क्षेत्रिय कार्यालये तसेच नागरिकांशी नित्य संबध येणा-या मनपाच्या विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संभाव्य घटनेस प्रतिबंध करण्याची पूर्वतयारी करावी, अशी सूचना मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी शनिवारी (दि.19) सामान्य प्रशासन विभागाला केली.
सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर उपस्थित होऊ शकणा-या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित विभागप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, डॉ. विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी पी. पी. बंकलवाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्त आणि विविध विभागप्रमुख उपस्थित होते. 
महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालय आणि अधिका-यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत दु:खद असून हल्लेखोरांच्या वतीने काही लोकांनी खोटी तक्रार करुन गुन्हा नोंदवण्यास भाग पाडल्याचे कळाल्यानंतर आपण पोलिस अधिक्षकांशी चर्चा केली आहे. जमाव पांगवण्याच्या उद्देशाने कदाचित प्रतितक्रार स्विकारुन पोलिसांनी असे केले असावे. कर्तव्य बजावताना महापालिका अधिकारी व कर्मचा-यांनी खचून जाऊ नये. प्रशासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात आयुक्तांनी सर्वांना आश्वस्थ केले.
मुलभूत सुविधा पुरवताना महापालिकेस अनेकदा अप्रिय कारवाई करावी लागते. अशा प्रसंगी सर्व क्षेत्रिय कार्यालय, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभाग, बीएसयुपी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध सेवा पुरविणा-या विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसविण्यात यावेत, अशी सूचना उपायुक्त विद्या गायकवाड यांना केली. कर्तव्य बजावताना कोणीही दबाबतंत्राचा वापर करुन अडथळा आणण्याची शक्यता असल्यास  मला तात्काळ कळवावे. त्यातून संबधितांवर कसे नियंत्रण आणता येईल, याचा निर्णय घेता येईल. आक्षेपकर्त्यांसोबत वादाचे प्रसंग टाळून सौम्य भाषेत संभाषण करुन त्यांना माझ्याकडे किंवा अप्पर आयुक्तांकडे पाठवावे. संबधितांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

           

No comments:

Post a Comment