Saturday, July 19, 2014

सिडको क्षेत्रिय कार्यालय व अधिका-यावरील हल्ल्याचा मनपा सर्वसाधारण सभेने नोंदवला निषेध


महापालिका कर्मचा-यांचे काळ्या फ़िती लावून आंदोलन
नांदेड, दि.19: सिडको क्षेत्रिय कार्यालयावर झालेली दगडफ़ेक आणि तेथील सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शनिवारी (दि.19) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने निषेध नोंदवण्यात आला. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी शनिवारी (दि.19) काळ्या फ़िती लावून काम करीत आपला निषेध नोंदवला.
      सिडको येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत अनाधिकृतपणे सुरु असलेल्या कोचिंग क्लासेसला सील ठोकल्याच्या कारणावरुन काही लोकांनी सिडको क्षेत्रिय कार्यालयात जमावासह येऊन सहायक आयुक्त गुलाम सादेख यांना जबर मारहाण करुन कार्यायावर दगडफ़ेक केली. हल्लेखोरांनी सादेख यांच्या कक्षातील काच व फ़र्निचरची नासधूस करुन दहशत निर्माण केली. या घटनेप्रकरणी काल शुक्रवारी (दि.18) दुपारी दोनपासून कार्यालयीन वेळ संपेपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करुन महापौर अब्दुल सत्तार व मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
      या घटनेची शनिवारी झालेया सर्वसाधारण सभेनेही दखल घेतली. विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, नगरसेवक रामनारायण काबरा आणि विनय गिरडे यांनी या विषयाकडे आयुक्तांचे लक्ष वेधून घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर सदर घटनेत महापालिकेच्या अधिका-यांचीही चूक असेल तर चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर उपस्थित सर्व नगरसेवकांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.

      सदर घटनेच्या व हल्लेखोरांच्या चिथावणीवरुन सादेख यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शनिवारी महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयासह विविध विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी काळ्या फ़िती लावून आपला आक्षेप नोंदवला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही आयुक्तांसह सर्व अधिकारी व विभागप्रमुखांनी काळ्या फ़िती लावूनच कामकाज केले.

No comments:

Post a Comment