Monday, July 28, 2014

महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात 18 अनाधिकृत होर्डिंग हटवले


नांदेड, दि.28: शहरातील विविध भागात विनापरवाना आणि अनाधिकृतपणे लावण्यात आलेले 18 होर्डिंग सोमवारी (दि.28) मनपा क्षेत्रिय अधिका-यांच्या पथकाने काढून टाकले. शिवाजीनगर येथील काही लोकांनी होर्डींग काढण्यास आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे सांगितल्यानंतर लोक शांत झाले आणि त्यांनी होर्डींग हटवण्याच्या कामात बाधा येऊ दिली नाही.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाने आज सोमवारी (दि.28) अचानकपणे ही मोहिम राबवली. मुंबई उच्च न्यायालयाने दि. 21 फ़ेब्रुवारी 2014 रोजी दिलेल्या निर्देशानुसार विनापरवानगी व अनाधिकृतपणे असलेले होर्डिंग काढून घेण्याची कारवाई यापुर्वीदेखील करण्यात आली असून काही प्रकरणात गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. शहराचे सौदर्य अबाधित ठेवून बेकायदेशीर होर्डिंगवर प्रतिबंध करण्याचे आदेश यापुर्वीच निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी केलेल्या सूचनेनुसार उपायुक्त रत्नाकर वाघमारे व राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त अविनाश अटकोरे, शिवाजी डहाळे, गणेशराव आडेराघो, सुधीर इंगोले, एस. टी. मोरे, मोहन डिंकाळे, नियंत्रक गणेश शिंगे, सहायक पोलिस निरिक्षक भराडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयातील कर निरिक्षक व पोलिस पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच सार्वजनिक मालमत्तेवर लावलेले 18 होर्डीग सोमवारी काढून टाकले. यामध्ये शिवाजीनगर झोन (4), अशोकनगर झोन(5), इतवारा झोन (3), वजिराबाद झोन (4) तर तरोडा झोनच्या 2 होर्डींगचा समावेश आहे. महापालिकेचे पथक होर्डिंग हटवत असल्याचे कळताच अनेकांनी लगेच आपले होर्डिंग काढून घेतले.
परवानगीशिवाय होर्डिंग नको: डॉ. देशपांडे

ज्यांना शहरात होर्डींग लावायचे आहेत, त्यांनी महापालिकेची रितसर परवानगी घेऊन दिलेल्या मुदतीतच होर्डिंग लावावे. जाहिरातीसाठी महापालिकेने काही कायम स्थळे निश्चित करुन अभिकर्त्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून परवानगी घेऊनच आपले होर्डिंग लावावेत. वाहतूक व रहदारीला अडथळा होणार नाही, अशा खाजगी जागेवर होर्डिंगला शक्य तितक्या लवकर तात्पुरती परवानगी देण्यात येईल. परंतु परवानगी असल्याशिवाय कोणीही दृष्टीगोचर होर्डिंग लावून सार्वजनिक मालमत्ता विरुपन कायद्याचा भंग करु नये तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी केले आहे.  

Friday, July 25, 2014

क्रीडा धोरणात शहरी भागाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करु : पालकमंत्री


श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमच्या विकासकामाचे भूमिपुजन
नांदेड, दि. 25: राज्याच्या क्रीडा धोरणात ग्रामीणप्रमाणे शहरी भागाचाही समावेश करण्यासाठी आपण शासनाकडे आग्रह धरुन त्यात नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमच्या विकासाला चालना देण्यासाठी कटीबध्द राहू, अशी ग्वाही पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी शुक्रवारी (दि.25) दिली.
महापालिकेच्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम विकासाचे भुमिपुजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी धीरजकुमार, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे,  प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे,  सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, गटनेते सय्यद शेरअली, माजी अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, कॉग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक दिलीप कंदकुर्ते, विजय येवणकर, नवल पोकर्णा, प्रभागाच्या नगरसेविका कमलाबाई मुदिराज, क्रिकेट संघटनेचे अशोक तेरकर, नंदकुमार मेगदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, की जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने स्टेडियम विकासाचे हे काम मार्गी लागत आहे. सदर काम दर्जेदार आणि वेळेत पुर्ण करावे, अशी सूचना त्यांनी केली. स्टेडियम विकासाच्या पुढच्या ट्प्प्य्यात रात्रीदेखील सामने खेळण्याची व्य्वस्था निर्माण करण्याची तयारी ठेवावी. त्याचबरोबर क्रिकेट खेळाच्या दर्जेदार मैदानाची उपलब्धता लक्षात घेऊन नांदेडमध्ये क्रिकेट ऍकडमी सुरु करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रभारी आयुक्त डॉ. देशपांडे देशात महाराष्ट्र या एकमेव राज्यात क्रिडा धोरण निश्चित झाल्याचे सांगून त्यात शहरी भागाचा समावेश करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यावर पालकमंत्र्यांनी या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्याची ग्वाही दिली.
माजी मनपा आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, की माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्टेडियममधील कार्यालये हलवून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान निर्माण करण्याची सूचना आम्हाला केली होती. त्यामुळे माझाही उत्साह वाढला. नांदेडमध्ये यापुर्वी रणजी सामने झाले. पण आताच्या मैदानाची अवस्था क्रिकेट खेळण्यायोग्य नाही. क्रिकेट हा जगातील केवळ लोकप्रिय खेळच नव्हे तर जेथे क्रिकेटचे सामने होतात,  त्या भागाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण होते. नांदेडमधील सुनील जाधवसुनील यादव, काजी शमाशुजमा उर्फ़ टिपू या तीन खेळाडूंची रणजी सामन्यासाठी निवड झाली, परंतु शहरात सरावाची व्यवस्था नसल्याने त्यांना इतर ठिकाणी जाऊन खेळावे लागले आहे. अशा मैदानातूनही मनपास वर्षाकाठी आज आठ लाख रुपये मिळतात. दर्जा सुधारला तर हे उत्पन्न 20 लाखापर्यंत जाईल. स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे विकास आणि शहरात ज्येष्ठ नागरिक भवन या सत्ताधारी पक्षाच्या जाहीरनाम्यातील असलेले विषयांना मार्गी लावले आहे.
उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सूत्रसंचलन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपायुक्त राजेंद्र खंदारे, सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे, उप अभियंता दिलीप टाकळीकर, शिवाजी बाबरे, सहायक आयुक्त गणेशराव आडेराघो, शिवाजी डहाळे, उद्यान अधिक्षक मिर्झा बेग आदी उपस्थित होते.


रामाप्रमाणे परत या, भरतासारखी वाट पाहिन



जी. श्रीकांत यांच्या निरोप समारंभात जिल्हाधिकारीही गहिवरले
नांदेड, दि.25: जी. श्रीकांत यांच्या साडेअकरा वर्षाच्या प्रवासात नांदेडशी भावनिक नाते जोडल्या गेले आहे. त्यांनी पुन्हा संधी मिळाली तर नांदेडला येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शासकीय सेवेत ते माझ्यापेक्षा कनिष्ठ असले तरी काम करण्यात माझ्यापेक्षा अधिक धाडसी आहेत. एक दीड वर्ष घालवून त्यांनी नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रामाप्रमाणे परत यावे, मी भरतासारखी त्यांची वाट पाहिन, अशा शब्दात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी गुरुवारी (दि.24) मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या निरोप समारंभात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित या सोहळ्याला गौरव समारंभाचे स्वरुप प्राप्त झाले होते. याप्रसंगी महापौर अब्दुल सत्तार, पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया,  सहायक जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, सहायक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जी. श्रीकांत यांचे वडील नरसप्पा सज्जन, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे,  विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, गटनेते सय्यद शेरअली, प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे,  नगरसेवक विनय पाटील-गिरडे, विनय गुर्रम, नगरसेविका अनुजा तेहरा, ललिता बोकारे, स्नेहा पांढरे, माजी महापौर सुधाकर पांढरे, माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात महापालिकेतून बदली झालेले अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, सहायक आयुक्त वसुधा फ़ड, लेखाधिकारी तु. ल. भिसे, उप अभियंता ढवळे यांनाही निरोप देण्यात आला. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, तिकीट कलेक्टर ते आयुक्त असा साडेअकरा वर्षाचा प्रवास एकट्या नांदेड जिल्ह्यात करुन साता-याला जाणारे जी. श्रीकांत यांच्यावर नांदेडचे खरोखरच काहीतरी कर्ज असावे. अन्यथा युपीएसएस्सीतून निवड झाल्यानंतर महाराष्ट्र केडर, नांदेड जिल्हा आणि त्यानंतर परिविक्षाधिन कालावधी आणि सलग दोन वेळा पूर्णवेळ जबाबदारी मिळणे त्यांच्या भाग्यात नसते.
नांदेडसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्विकारताना डॉ. श्रीकर परदेशी यांच्या तुलनेत कामगिरी करु शकतो की नाही, याची शाश्वती मला नव्हती. निर्णय घेताना मी थोडे मागे हटतो. क्रिकेटमध्ये चांगली बॅटींग करणा-या श्रीकांत यांनी प्रशासकीय कामात त्यांनी आव्हानाला सामोरे जाण्याचे दाखवलेले धाडस कौतुकास्पदच नव्हे तर इतर सर्व अधिका-यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्याकडून मलाही बरेच काही शिकायला मिळाले आहे. भर सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांच्या विरोधात जाऊन आपल्या अधिका-यांना पाठिंबा द्यायला खुप मोठे धैर्य लागते. कार्यालयाप्रमुखाच्या अशा कृतीमुळे प्रामाणिकपणे व चांगले काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढत असते.
जिल्हा परिषदेपेक्षा मनपात काम करणे कठीण असते.  त्यामुळेच नवीन आयएएस अधिका-यांना आधी ज़िल्हा परिषद आणि नंतर महापालिकेत पाठवले जाते. पण श्रीकांत यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून पहिली पोस्टींग मिळाली, याचाच अर्थ त्यांच्या कार्यक्षमतेची शासनाला जाणीव असावी. नांदेड महापालिकेच्या उत्पन्न वाढविण्यापासून केलेल्या अनेक प्रशासकीय सुधारणेमुळेच त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात बोलावले आहे. याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, विद्या गायकवाड, यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, विभागप्रमुख, इतर अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, अभियंते, वास्तुविशारद, ठेकेदार, नागरिक उपस्थित होते.


Monday, July 21, 2014

बीएसयुपी लाभार्थ्यांना ताबापावती देण्यासाठी आजपासून विशेष शिबिर


नांदेड, दि.21: बीएसयुपी योजनेत ज्यांची घरे बांधून पूर्ण झाली आहेत, अशा लाभार्थ्यांना ताबा पावती देण्यासाठी उद्या मंगळवारपासून (दि.22) दर मंगळवारी झोननिहाय विशेष शिबिर घेतले जाणार आहे. ताबा पावती हस्तांतरीत होना-या लाभार्थ्यांना बायोमेट्रिक कार्ड देण्यासाठी याच शिबिरात त्यांची माहिती व इतर तपशिल संकलीत केला जाणार आहे. या शिबिरासाठी उप अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सहा क्षेत्रिय कार्यालयात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
      नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या बीएसयुपी प्रकल्पांतर्गत झोपडपट्टीधारकांना 27 हजार पक्की घरे बाधून देण्यात येत असून त्यातील 15 हजार लाभार्थ्यांची घरे बांधून पूर्ण झाली आहेत. यातील 70 ते 80 टक्के घरांमध्ये लाभार्थी राहायला गेले आहेत. परंतु बहुतेक जणांकडे ताबा पावती नसल्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा अधिकृतपणे लाभ मिळण्यात त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर घर ताब्यात घेतलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलाचा लोकवाटा पूर्णपणे भरलेला आहे की नाही, याची पडताळणी करणे आवश्यक असल्याने शिबिराद्वारे ताबा पावती वाटप करुन दुसरीकडे लोकवाटा भरण्यात दिरंगाई करणा-या लाभार्थ्यांना शोधण्याचे कामही यानिमित्ताने केले जाणार आहे.
या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी सर्व पथकांना कालबध्द कार्यक्रम निश्चित करुन देण्यात आले आहे. पथकांनी दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान ताबा पावती लिहून, तपासून त्यावर कार्यकारी अभियंता व उपायुक्त यांच्या स्वाक्षरीसाठी तयार ठेवावे. सोमवारी सायंकाळी या दोन अधिका-यांच्या स्वाक्ष-या घेऊन ताबा पावती वाटपासाठी तयार ठेवाव्यात. संबधित क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरात रस्त्याला लागून असलेल्या किंवा सर्वांना येणे सोयीचे ठरेल अशा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी समारंभपुर्वक दर मंगळवारी ताबा पावतीचे वाटप करावेत, अशा सूचना लेखी आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.
      झोननिहाय पथकप्रमुख उप अभियंत्यांची नावे अशी: झोन क्र. 1, शिवाजीनगर : सुनील देशमुख, झोन क्र. 2, अशोकनगर : एम. एस. बोधनकर, झोन क्र. 3 इतवारा व झोन क्र.4, वजिराबाद : नरेंद्र सुजलेगावकर, झोन क्र. 5, सिडको: दिलीप आरसुडे, झोन क्र. 6, तरोडा: विश्वनाथ स्वामी. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या दैंनदिन मुलभूत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी बीएसयुपी, पाणीपुरवठा व मल:निसारण, आरोग्य व स्वच्छता तसेच विद्युत विभागाच्या अधिकारी किंवा जबाबदार कर्मचा-यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमास त्या-त्या परिसरातील महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक/नगरसेविकांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

            

महापालिकेच्या वृक्षदिंडीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ





नांदेड, दि.21: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सोमवारी (दि.21) आयोजित वृक्षदिंडीला उदंड प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते स्टेडीयम परिसरात या वृक्षदिंडीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. वृक्षदिंडीनंतर बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रमास उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती इतरत फातेमा, उपसभापती पार्वती जिंदम, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक गोविंद बिडवई यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथून सकाळी 8.30 वाजता निघालेल्या वृक्षदिंडीत मनपा आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त डॉ. निशीकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, डॉ. विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी पी. पी. बंकलवाड, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, संजय जाधव, सुधीर इंगोले, अविनाश अटकोरे, गणेशराव आडेराघो, एस. टी. मोरे, विलास भोसीकर, उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा बेग, शिक्षणाधिकारी जोशी, नोडल ऑफ़ीसर विलास पांचाळ, व्यंकटेश जिंदम, सय्यद शोहेब यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी चालत सहभागी झाले होते.
ही वृक्षदिंडी आयटीएम-रेल्वे स्टेशन रस्ता, बिग सिनेमा (ज्योती टॉकीज), शहाजी मार्केट, शिवाजीनगर उड्डाणपुल, कलामंदीर, मुथा चौक, शिवाजी पुतळा मार्गे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पोहचली. तेथे दोन विद्यार्थ्यांचे प्रातनिधीक स्वरुपात मनोगत झाल्यानंतर मनपा शाळेचे सर्व विद्यार्थी आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी बोंढार येथे रवाना झाले. बोंढार येथे मनपा आयुक्तांसह मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी लावलेल्या वृक्षाला विविध मान्यवरांची नावे देण्यात आली. या परिसरातील जलकुंभाच्या परिसरात जवळपास एक हजार झाडे लावण्याचे काम दिवसभर सुरु होते. बोंढार मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या निसर्गरम्य परिसरात विद्यार्थ्यांनी यावेळी सहलीचाही मनमुराद आनंद लुटला.


Sunday, July 20, 2014

महापालिकेची आज वृक्षदिंडी आणि महा वृक्षारोपण

नांदेड, दि. 20: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सोमवारी (दि.21) सकाळी 8 वाजता श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत मनपा शाळेचे विद्यार्थी व महापालिकेच्या अधिकारी- कर्मचा-यांच्या सहभागातून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

मागील वर्षी कृषी विद्यालयाच्या परिसरात हा उपक्रम घेण्यात आला होता. यावर्षी महापालिकेच्या वतीने कार्यान्वित झालेल्या बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात महा वृक्षारोपण करुन तेथील पर्यावरणाच्या संवर्धनाचा संकल्प महापालिकेने सोडला असून या स्थळाला भेट देणा-या मान्यवरांना हे स्थळ रमणीय अनुभवण्यास मदत होणार आहे. याच परिसरात शहरातील घाण पाण्यावर शुध्दिकरणाची प्रक्रिया होणार असल्याने येथे बारमाही पाण्याची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे झाडांचे संगोपन करण्याची व्यवस्था आणखी सुलभ होणार आहे.

महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती इतरत फातेमा, उपसभापती पार्वती जिंदम, गटनेत्या डॉ. शीला कदम, सय्यद शेरअली यांच्यासह सर्व सदस्य, सदस्या व महापालिकेच्या अधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल.

वृक्षदिंडीत महापालिकेच्या शाळेतील सुमारे 400 विद्यार्थी सहभागी होणार असून हे सर्व विद्यार्थी व महापालिकेचे अधिकारी- कर्मचारी वृक्षदिंडीनंतर महा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी बोंढार येथे रवाना होतील. या उपक्रमासाठी नांदेड नेचर क्लबनेही सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. नागरिक आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांमध्ये वृक्षारोपणाचे महत्व वाढून पर्यावरणाचे रक्षण व्हावे, हा या उपक्रमामागचा हेतु आहे.

--------–--------------------

फ़ोटो ओळी:
बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात सोमवारी होणा-या महा वृक्षारोपण कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

Saturday, July 19, 2014

सिडको क्षेत्रिय कार्यालय व अधिका-यावरील हल्ल्याचा मनपा सर्वसाधारण सभेने नोंदवला निषेध


महापालिका कर्मचा-यांचे काळ्या फ़िती लावून आंदोलन
नांदेड, दि.19: सिडको क्षेत्रिय कार्यालयावर झालेली दगडफ़ेक आणि तेथील सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शनिवारी (दि.19) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने निषेध नोंदवण्यात आला. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी शनिवारी (दि.19) काळ्या फ़िती लावून काम करीत आपला निषेध नोंदवला.
      सिडको येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत अनाधिकृतपणे सुरु असलेल्या कोचिंग क्लासेसला सील ठोकल्याच्या कारणावरुन काही लोकांनी सिडको क्षेत्रिय कार्यालयात जमावासह येऊन सहायक आयुक्त गुलाम सादेख यांना जबर मारहाण करुन कार्यायावर दगडफ़ेक केली. हल्लेखोरांनी सादेख यांच्या कक्षातील काच व फ़र्निचरची नासधूस करुन दहशत निर्माण केली. या घटनेप्रकरणी काल शुक्रवारी (दि.18) दुपारी दोनपासून कार्यालयीन वेळ संपेपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करुन महापौर अब्दुल सत्तार व मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
      या घटनेची शनिवारी झालेया सर्वसाधारण सभेनेही दखल घेतली. विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, नगरसेवक रामनारायण काबरा आणि विनय गिरडे यांनी या विषयाकडे आयुक्तांचे लक्ष वेधून घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर सदर घटनेत महापालिकेच्या अधिका-यांचीही चूक असेल तर चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर उपस्थित सर्व नगरसेवकांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.

      सदर घटनेच्या व हल्लेखोरांच्या चिथावणीवरुन सादेख यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शनिवारी महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयासह विविध विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी काळ्या फ़िती लावून आपला आक्षेप नोंदवला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही आयुक्तांसह सर्व अधिकारी व विभागप्रमुखांनी काळ्या फ़िती लावूनच कामकाज केले.