Friday, July 25, 2014

रामाप्रमाणे परत या, भरतासारखी वाट पाहिन



जी. श्रीकांत यांच्या निरोप समारंभात जिल्हाधिकारीही गहिवरले
नांदेड, दि.25: जी. श्रीकांत यांच्या साडेअकरा वर्षाच्या प्रवासात नांदेडशी भावनिक नाते जोडल्या गेले आहे. त्यांनी पुन्हा संधी मिळाली तर नांदेडला येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शासकीय सेवेत ते माझ्यापेक्षा कनिष्ठ असले तरी काम करण्यात माझ्यापेक्षा अधिक धाडसी आहेत. एक दीड वर्ष घालवून त्यांनी नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रामाप्रमाणे परत यावे, मी भरतासारखी त्यांची वाट पाहिन, अशा शब्दात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी गुरुवारी (दि.24) मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या निरोप समारंभात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित या सोहळ्याला गौरव समारंभाचे स्वरुप प्राप्त झाले होते. याप्रसंगी महापौर अब्दुल सत्तार, पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया,  सहायक जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, सहायक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जी. श्रीकांत यांचे वडील नरसप्पा सज्जन, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे,  विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, गटनेते सय्यद शेरअली, प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे,  नगरसेवक विनय पाटील-गिरडे, विनय गुर्रम, नगरसेविका अनुजा तेहरा, ललिता बोकारे, स्नेहा पांढरे, माजी महापौर सुधाकर पांढरे, माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात महापालिकेतून बदली झालेले अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, सहायक आयुक्त वसुधा फ़ड, लेखाधिकारी तु. ल. भिसे, उप अभियंता ढवळे यांनाही निरोप देण्यात आला. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, तिकीट कलेक्टर ते आयुक्त असा साडेअकरा वर्षाचा प्रवास एकट्या नांदेड जिल्ह्यात करुन साता-याला जाणारे जी. श्रीकांत यांच्यावर नांदेडचे खरोखरच काहीतरी कर्ज असावे. अन्यथा युपीएसएस्सीतून निवड झाल्यानंतर महाराष्ट्र केडर, नांदेड जिल्हा आणि त्यानंतर परिविक्षाधिन कालावधी आणि सलग दोन वेळा पूर्णवेळ जबाबदारी मिळणे त्यांच्या भाग्यात नसते.
नांदेडसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्विकारताना डॉ. श्रीकर परदेशी यांच्या तुलनेत कामगिरी करु शकतो की नाही, याची शाश्वती मला नव्हती. निर्णय घेताना मी थोडे मागे हटतो. क्रिकेटमध्ये चांगली बॅटींग करणा-या श्रीकांत यांनी प्रशासकीय कामात त्यांनी आव्हानाला सामोरे जाण्याचे दाखवलेले धाडस कौतुकास्पदच नव्हे तर इतर सर्व अधिका-यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्याकडून मलाही बरेच काही शिकायला मिळाले आहे. भर सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांच्या विरोधात जाऊन आपल्या अधिका-यांना पाठिंबा द्यायला खुप मोठे धैर्य लागते. कार्यालयाप्रमुखाच्या अशा कृतीमुळे प्रामाणिकपणे व चांगले काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढत असते.
जिल्हा परिषदेपेक्षा मनपात काम करणे कठीण असते.  त्यामुळेच नवीन आयएएस अधिका-यांना आधी ज़िल्हा परिषद आणि नंतर महापालिकेत पाठवले जाते. पण श्रीकांत यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून पहिली पोस्टींग मिळाली, याचाच अर्थ त्यांच्या कार्यक्षमतेची शासनाला जाणीव असावी. नांदेड महापालिकेच्या उत्पन्न वाढविण्यापासून केलेल्या अनेक प्रशासकीय सुधारणेमुळेच त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात बोलावले आहे. याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, विद्या गायकवाड, यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, विभागप्रमुख, इतर अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, अभियंते, वास्तुविशारद, ठेकेदार, नागरिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment