नांदेड, दि. 20: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सोमवारी (दि.21) सकाळी 8 वाजता श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत मनपा शाळेचे विद्यार्थी व महापालिकेच्या अधिकारी- कर्मचा-यांच्या सहभागातून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
मागील वर्षी कृषी विद्यालयाच्या परिसरात हा उपक्रम घेण्यात आला होता. यावर्षी महापालिकेच्या वतीने कार्यान्वित झालेल्या बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात महा वृक्षारोपण करुन तेथील पर्यावरणाच्या संवर्धनाचा संकल्प महापालिकेने सोडला असून या स्थळाला भेट देणा-या मान्यवरांना हे स्थळ रमणीय अनुभवण्यास मदत होणार आहे. याच परिसरात शहरातील घाण पाण्यावर शुध्दिकरणाची प्रक्रिया होणार असल्याने येथे बारमाही पाण्याची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे झाडांचे संगोपन करण्याची व्यवस्था आणखी सुलभ होणार आहे.
महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती इतरत फातेमा, उपसभापती पार्वती जिंदम, गटनेत्या डॉ. शीला कदम, सय्यद शेरअली यांच्यासह सर्व सदस्य, सदस्या व महापालिकेच्या अधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल.
वृक्षदिंडीत महापालिकेच्या शाळेतील सुमारे 400 विद्यार्थी सहभागी होणार असून हे सर्व विद्यार्थी व महापालिकेचे अधिकारी- कर्मचारी वृक्षदिंडीनंतर महा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी बोंढार येथे रवाना होतील. या उपक्रमासाठी नांदेड नेचर क्लबनेही सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. नागरिक आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांमध्ये वृक्षारोपणाचे महत्व वाढून पर्यावरणाचे रक्षण व्हावे, हा या उपक्रमामागचा हेतु आहे.
--------–--------------------
फ़ोटो ओळी:
बोंढार येथील मलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात सोमवारी होणा-या महा वृक्षारोपण कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.
No comments:
Post a Comment