Monday, July 28, 2014

महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात 18 अनाधिकृत होर्डिंग हटवले


नांदेड, दि.28: शहरातील विविध भागात विनापरवाना आणि अनाधिकृतपणे लावण्यात आलेले 18 होर्डिंग सोमवारी (दि.28) मनपा क्षेत्रिय अधिका-यांच्या पथकाने काढून टाकले. शिवाजीनगर येथील काही लोकांनी होर्डींग काढण्यास आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे सांगितल्यानंतर लोक शांत झाले आणि त्यांनी होर्डींग हटवण्याच्या कामात बाधा येऊ दिली नाही.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाने आज सोमवारी (दि.28) अचानकपणे ही मोहिम राबवली. मुंबई उच्च न्यायालयाने दि. 21 फ़ेब्रुवारी 2014 रोजी दिलेल्या निर्देशानुसार विनापरवानगी व अनाधिकृतपणे असलेले होर्डिंग काढून घेण्याची कारवाई यापुर्वीदेखील करण्यात आली असून काही प्रकरणात गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. शहराचे सौदर्य अबाधित ठेवून बेकायदेशीर होर्डिंगवर प्रतिबंध करण्याचे आदेश यापुर्वीच निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी केलेल्या सूचनेनुसार उपायुक्त रत्नाकर वाघमारे व राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त अविनाश अटकोरे, शिवाजी डहाळे, गणेशराव आडेराघो, सुधीर इंगोले, एस. टी. मोरे, मोहन डिंकाळे, नियंत्रक गणेश शिंगे, सहायक पोलिस निरिक्षक भराडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयातील कर निरिक्षक व पोलिस पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच सार्वजनिक मालमत्तेवर लावलेले 18 होर्डीग सोमवारी काढून टाकले. यामध्ये शिवाजीनगर झोन (4), अशोकनगर झोन(5), इतवारा झोन (3), वजिराबाद झोन (4) तर तरोडा झोनच्या 2 होर्डींगचा समावेश आहे. महापालिकेचे पथक होर्डिंग हटवत असल्याचे कळताच अनेकांनी लगेच आपले होर्डिंग काढून घेतले.
परवानगीशिवाय होर्डिंग नको: डॉ. देशपांडे

ज्यांना शहरात होर्डींग लावायचे आहेत, त्यांनी महापालिकेची रितसर परवानगी घेऊन दिलेल्या मुदतीतच होर्डिंग लावावे. जाहिरातीसाठी महापालिकेने काही कायम स्थळे निश्चित करुन अभिकर्त्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून परवानगी घेऊनच आपले होर्डिंग लावावेत. वाहतूक व रहदारीला अडथळा होणार नाही, अशा खाजगी जागेवर होर्डिंगला शक्य तितक्या लवकर तात्पुरती परवानगी देण्यात येईल. परंतु परवानगी असल्याशिवाय कोणीही दृष्टीगोचर होर्डिंग लावून सार्वजनिक मालमत्ता विरुपन कायद्याचा भंग करु नये तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी केले आहे.  

No comments:

Post a Comment