नांदेड, दि.21: बीएसयुपी योजनेत ज्यांची घरे बांधून पूर्ण झाली आहेत, अशा
लाभार्थ्यांना ताबा पावती देण्यासाठी उद्या मंगळवारपासून (दि.22) दर मंगळवारी झोननिहाय
विशेष शिबिर घेतले जाणार आहे. ताबा पावती हस्तांतरीत होना-या लाभार्थ्यांना
बायोमेट्रिक कार्ड देण्यासाठी याच शिबिरात त्यांची माहिती व इतर तपशिल संकलीत केला
जाणार आहे. या शिबिरासाठी उप अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सहा क्षेत्रिय
कार्यालयात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
नांदेड वाघाळा शहर
महानगरपालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या बीएसयुपी प्रकल्पांतर्गत
झोपडपट्टीधारकांना 27 हजार पक्की घरे बाधून देण्यात येत असून त्यातील 15 हजार
लाभार्थ्यांची घरे बांधून पूर्ण झाली आहेत. यातील 70 ते 80 टक्के घरांमध्ये
लाभार्थी राहायला गेले आहेत. परंतु बहुतेक जणांकडे ताबा पावती नसल्यामुळे लाभार्थ्यांना
घरांचा अधिकृतपणे लाभ मिळण्यात त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर घर
ताब्यात घेतलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलाचा लोकवाटा पूर्णपणे भरलेला आहे की नाही,
याची पडताळणी करणे आवश्यक असल्याने शिबिराद्वारे ताबा पावती वाटप करुन दुसरीकडे
लोकवाटा भरण्यात दिरंगाई करणा-या लाभार्थ्यांना शोधण्याचे कामही यानिमित्ताने केले
जाणार आहे.
या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी सर्व पथकांना कालबध्द
कार्यक्रम निश्चित करुन देण्यात आले आहे. पथकांनी दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 4
दरम्यान ताबा पावती लिहून, तपासून त्यावर कार्यकारी अभियंता व उपायुक्त यांच्या
स्वाक्षरीसाठी तयार ठेवावे. सोमवारी सायंकाळी या दोन अधिका-यांच्या स्वाक्ष-या
घेऊन ताबा पावती वाटपासाठी तयार ठेवाव्यात. संबधित क्षेत्रिय कार्यालयाच्या
परिसरात रस्त्याला लागून असलेल्या किंवा सर्वांना येणे सोयीचे ठरेल अशा जवळच्या
सार्वजनिक ठिकाणी समारंभपुर्वक दर मंगळवारी ताबा पावतीचे वाटप करावेत, अशा सूचना लेखी
आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.
झोननिहाय पथकप्रमुख उप
अभियंत्यांची नावे अशी: झोन क्र. 1, शिवाजीनगर : सुनील देशमुख, झोन क्र. 2,
अशोकनगर : एम. एस. बोधनकर, झोन क्र. 3 इतवारा व झोन क्र.4, वजिराबाद : नरेंद्र
सुजलेगावकर, झोन क्र. 5, सिडको: दिलीप आरसुडे, झोन क्र. 6, तरोडा: विश्वनाथ
स्वामी. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या दैंनदिन मुलभूत समस्यांची सोडवणूक
करण्यासाठी बीएसयुपी, पाणीपुरवठा व मल:निसारण, आरोग्य व स्वच्छता तसेच विद्युत
विभागाच्या अधिकारी किंवा जबाबदार कर्मचा-यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात
आल्या आहेत. कार्यक्रमास त्या-त्या परिसरातील महापालिकेचे पदाधिकारी व
नगरसेवक/नगरसेविकांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment