Friday, July 25, 2014

क्रीडा धोरणात शहरी भागाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करु : पालकमंत्री


श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमच्या विकासकामाचे भूमिपुजन
नांदेड, दि. 25: राज्याच्या क्रीडा धोरणात ग्रामीणप्रमाणे शहरी भागाचाही समावेश करण्यासाठी आपण शासनाकडे आग्रह धरुन त्यात नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमच्या विकासाला चालना देण्यासाठी कटीबध्द राहू, अशी ग्वाही पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी शुक्रवारी (दि.25) दिली.
महापालिकेच्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम विकासाचे भुमिपुजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी धीरजकुमार, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती उमेश पवळे,  प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे,  सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, गटनेते सय्यद शेरअली, माजी अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, कॉग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक दिलीप कंदकुर्ते, विजय येवणकर, नवल पोकर्णा, प्रभागाच्या नगरसेविका कमलाबाई मुदिराज, क्रिकेट संघटनेचे अशोक तेरकर, नंदकुमार मेगदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, की जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने स्टेडियम विकासाचे हे काम मार्गी लागत आहे. सदर काम दर्जेदार आणि वेळेत पुर्ण करावे, अशी सूचना त्यांनी केली. स्टेडियम विकासाच्या पुढच्या ट्प्प्य्यात रात्रीदेखील सामने खेळण्याची व्य्वस्था निर्माण करण्याची तयारी ठेवावी. त्याचबरोबर क्रिकेट खेळाच्या दर्जेदार मैदानाची उपलब्धता लक्षात घेऊन नांदेडमध्ये क्रिकेट ऍकडमी सुरु करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रभारी आयुक्त डॉ. देशपांडे देशात महाराष्ट्र या एकमेव राज्यात क्रिडा धोरण निश्चित झाल्याचे सांगून त्यात शहरी भागाचा समावेश करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यावर पालकमंत्र्यांनी या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्याची ग्वाही दिली.
माजी मनपा आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, की माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्टेडियममधील कार्यालये हलवून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान निर्माण करण्याची सूचना आम्हाला केली होती. त्यामुळे माझाही उत्साह वाढला. नांदेडमध्ये यापुर्वी रणजी सामने झाले. पण आताच्या मैदानाची अवस्था क्रिकेट खेळण्यायोग्य नाही. क्रिकेट हा जगातील केवळ लोकप्रिय खेळच नव्हे तर जेथे क्रिकेटचे सामने होतात,  त्या भागाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण होते. नांदेडमधील सुनील जाधवसुनील यादव, काजी शमाशुजमा उर्फ़ टिपू या तीन खेळाडूंची रणजी सामन्यासाठी निवड झाली, परंतु शहरात सरावाची व्यवस्था नसल्याने त्यांना इतर ठिकाणी जाऊन खेळावे लागले आहे. अशा मैदानातूनही मनपास वर्षाकाठी आज आठ लाख रुपये मिळतात. दर्जा सुधारला तर हे उत्पन्न 20 लाखापर्यंत जाईल. स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे विकास आणि शहरात ज्येष्ठ नागरिक भवन या सत्ताधारी पक्षाच्या जाहीरनाम्यातील असलेले विषयांना मार्गी लावले आहे.
उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सूत्रसंचलन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपायुक्त राजेंद्र खंदारे, सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे, उप अभियंता दिलीप टाकळीकर, शिवाजी बाबरे, सहायक आयुक्त गणेशराव आडेराघो, शिवाजी डहाळे, उद्यान अधिक्षक मिर्झा बेग आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment