नांदेड, दि.28: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या नियोजनासाठी नांदेडमध्ये दाखल झालेल्या पंढरपुर देवस्थान विकास प्राधिकरण समितीच्या पथकाने मंगळवारी (दि.29) नांदेड शहरातील विविध विकास प्रकल्पाची पाहणी केली.
पथकाने नदीघाट विकास आणि सुशोभिकरण, अम्पी थियटर, अबचलनगर पुनर्वसित प्रकल्प, बोंढार येथील मलशुध्दीकरण केंद्र, श्रावस्तीनगर येथे विस्थापित कुटुंबांना बीएसयुपी प्रकल्पात बहुमजली इमारत बांधून केलेले त्यांचे पुनर्वसन, गोविंद बाग अशा विविध कामांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, उपअभियंता प्रकाश कांबळे, आयएलएफ़एसचे नरेश वर्मा, वाय. एन. कदम, शारदा कन्स्ट्रक्शनचे चौधरी यांनी विविध प्रकल्पाची माहिती दिली.
पंढरपूरमध्ये प्रत्येक एकादशीला येणारे हजारो भाविक आणि आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला येणा-या लाखो भाविकांना तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी केलेल्या सूचनेनुसार ही समिती देशात हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि नांदेड या चार शहराला भेटी देणार आहे. पंढरपुर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने 512 कोटी रुपयांचा निधी दिला असून जसजशी गरज भासेल तसतसा आणखी निधी मिळणार असल्याचे पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.
पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोरे, सोलापूरच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक पाटील, सल्लागार शरद मोहिते यांच्या समितीने प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर प्रत्येक कामाबद्दल कौतुक केले. अत्यंत कमी वेळेत प्रशासनाला कौशल्यपुर्वक कामे करता आली. राज्य आणि केंद्र सरकार पाठीशी असणे, विकासकामात नागरिकांचा सहभाग, राजकीय इच्छा शक्ती आणि प्रशासकीय गतिमानता अशा सर्व बाबी एकदाच जुळून आल्यामुळे नांदेड मध्ये अद्वितीय विकासकामे होऊ शकली, असा अभिप्राय समितीने यावेळी नोंदवला.