नांदेड, दि.2: रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारी
व वाहतुकीला अडथळा आणणा-या व्हीआयपी रस्त्यावरील दोन इमारतधारकांकडून प्रत्येकी 11
हजार याप्रमाणे 22 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. इमारत बांधकाम करताना रस्ता
किंवा सार्वजनिक जागेचा वापर करणा-या मालमत्ताधारकांकडून दंड आकारण्याच्या सूचना
मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या होत्या. त्यानंतर शहरात झालेली ही पहिलीच
कारवाई आहे. या कारवाईमुळे नियमबाह्य पध्द्तीने बांधकामाचा साठा रस्त्यावर टाकणा-या
मालमत्ताधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोणत्याही इमारतीचे बांधकाम करताना मालमत्ताधारकाने
शक्यतो आपल्याकडे उपलब्ध असलेल्या खाजगी जागेचा वापर करणे आवश्यक आहे. अपवादात्मक
स्थितीत रहदारी व वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने खुल्या जागेत मर्यादित
कालावधीसाठी बांधकाम साहित्याचा साठा करण्यास परवानगी देण्याबाबत प्रकरणनिहाय
निर्णय घेण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी काढले होते. त्याचवेळी रस्त्यावर विनापरवाना
कोणी बांधकाम साहित्य टाकत असेल तर नाली, ड्रेनेज, रस्ता व रहदारीला त्याचा अडथळा
होत असल्याच्या कारणावरुन संबधित मालमत्ताधारकाकडून दंड आकारुन बांधकाम साहित्य
काढून टाकण्याचा खर्च वसूल करण्याच्या सूचनाही मनपा आयुक्तांनी दिल्या होत्या.
व्हीआयपी रस्त्यावर ठक्कर स्टील इंडस्ट्री आणि
राजकुमार काला यांच्या मालमत्तेत इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या दोघांनीही
महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता नियमबाह्यरित्या इमरतीसमोर रस्त्याच्या कडेला
बांधकाम साहित्याचा साठा करुन या रस्त्यावरील वाहतूक व रहदारीला अडथळा निर्माण
केल्याचे बुधवारी अशोकनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त गणेशराव आडेराघो
यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या निदर्शनास आले. या पथकात इमारत निरिक्षक विजय
कुलकर्णी आणि स्वच्छता निरिक्षक गणेश मुदिराज यांचा समावेश होता. पथकाने या
दोघांकडूनही तात्काळ प्रत्येकी 11 हजार रुपयांचा दंड आकारुन साहित्य तात्काळ
हलवण्याची सूचना केली. उद्या दुपारपर्यंत साहित्य हलवले नाही तर महापालिकेच्या
पथकामार्फ़त जप्त करुन हलविण्याचा खर्चही संबधिताकडून वसूल केला जाईल, असा इशारा
देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment