Wednesday, July 2, 2014

खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह 380 जणांनी भरला ऑनलाईन कर


10 टक्के सूटची मुदत संपली, आता 7 टक्के सूट मिळणार

नांदेड, दि.2: मालमत्ता करात सुधारणा झाल्यानंतर महापालिकेने अग्रीम कर भरल्यास घसघशीत सूट देण्याच्या सुरु केलेल्या योजनेला मालमत्ताधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दि. 5 ते 30 जून 2014 या कालावधीत 380 मालमत्ताधारकांनी आपल्याकडील 42 लाख रुपयांचा मालमत्ता कर ऑनलाईन प्रणालीद्वारे भरुन 2 टक्के जादा सूट मिळवली आहे. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण यांनीही पुढाकार घेऊन आपल्याकडील 2014-15 वर्षाचा 5 लाख 68 हजार 944 रुपयांचा मालमत्ता कर अग्रीम स्वरुपात ऑनलाईन भरुन शहराच्या विकासकामात आपला व्यक्तीश: वाटा उचलला आहे.

दि. 1 एप्रिल 2014 पासून 2014-15 चा अग्रिम मालमत्ता कर भरणा-या मालमत्ताधारकांना विशेष योजना जाहीर करुन मालमत्ता करात सूट देण्यात आली आहे. त्यानुसार 30 जून 2014 पर्यंत बिल कलेक्टर किंवा क्षेत्रिय कार्यालयात कराचा भरणा केल्यास 8 टक्के आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे भरल्यास 2 टक्के जादा याप्रमाणे मालमत्ता करात एकूण 10 टक्के सूट देण्यात आली. ऑनलाईन प्रणालीद्वारे करभरणा झाल्यास मनपाच्या बिल कलेक्टरकडून मालमत्ताधारकांशी संपर्कासाठी लागणारा वेळ, मागणी बिल आणि पावतीसाठी लागणा-या कागदाचा खर्च वाचून मनुष्यबळावरील खर्चातही कपात करणे शक्य असल्याने महापालिकेने ऑनलाईन भरणा करणा-यांना जादा सूट देण्याचे धोरण राबवले आहे.

ही योजना जाहीर झाल्यापासून (दि.5 जून 2014) 380 जणांनी आपल्याकडील 41 लाख 63 हजार 595 रुपयांचा मालमत्ता कर ऑनलाईन भरला. यात शेवटच्या आठवड्यात दि. 24 ते 30 जून या कालावधीत सर्वाधिक 246 धारकांनी आपला 34 लाख 38 हजार 27 रुपयांच्या कराचा भरणा ऑनलाईन केला आहे. महापालिकेने प्रथमच राबवलेल्या या प्रणालीची माहिती होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात एकाच वेळी एकदिवसीय शिबिर घेतले होते. त्यासही चांगला प्रतिसाद मिळाला.

आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मनपाचे अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, मुख्य लेखाधिकारी पी. पी. बंकलवाड, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, सहायक आयुक्त अविनाश अटकोरे, संजय जाधव, गुलाम सादेक, मोहन डिंकाळे, सुधीर इंगोले, एस. टी. मोरे, शिवाजी डहाळे, आयुक्तांचे स्वीय सहायक कुमार कुलकर्णी, कर विभागाचे दत्तात्रय पाटील, गजानन रासे यांच्यासह मनपाचे विविध अधिकारी, कर्मचारी यांनीही य सुविधेचा लाभ घेतला आहे.  

30 सप्टेंबरपर्यंत 7 टक्के सूट मिळणार
दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर यादरम्यान ऑनलाईन कर भरणा-यास 7 आणि रोखीने भरणा-यास 5 टक्के याप्रमाणे सूट दिली जाणार आहे. दि. 1 ऑक्टोंबर ते 31 डिसेंबर 2014 यादरम्यान कराचा भरणा केल्यास ऑनलाईनधारकांना 5 टक्के आणि रोखीने भरणा-यास 3 टक्के सूट मिळेल. जानेवारी ते मार्च 2015 दरम्यान कर भरणा-यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. ज्यांना आतापर्यंत मालमत्ता कराची मागणी बिले मिळाली नाहीत त्यांनी बिलांची वाट न पाहता www.nwcmc.gov.in या मनपाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन स्वरुपात मालमत्ता कर भरणा करावा तसेच सूट योजनेचा जास्तीत जास्त फ़ायदा मिळवावा, असे कर विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


मालमत्ताधारकांना आवाहन

ऑनलाईन स्वरुपात कराचा भरणा करण्यास असमर्थ असणा-यांनी आपल्या बिल कलेक्टर किंवा क्षेत्रिय कार्यालयात तात्काळ संपर्क करुन रोख स्वरुपात कराचा भरणा करुन 30 सप्टेंबर 2014 पर्यंत 5 टक्के सूट प्राप्त करुन घ्यावी. ज्यांनी अद्याप आपला मालमत्ता कर भरला नाही, अशांनी रोख किंवा ऑनलाईन कर भरण्याच्या सूट योजनेचा लाभ घेऊन शहराच्या विकासकामात स्वत:चा सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर अब्दुल सत्तार, स्थायी समिती सभापती उमेश पवळे, आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment