महापालिकेच्या
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन अभ्यास वर्गात
नूतन
आयएएस माधव सुलफ़ुले साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
आजचा
कार्यक्रम 5 ऐवजी 4 वाजता
नांदेड, दि.4: नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी
परिक्षेच्या निकालात देशातून 387 वा रॅन्क मिळवलेले नांदेड्चे भूमिपुत्र माधव
सुलफ़ुले हे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने
आयोजित कार्यक्रमात युपीएससी/एमपीएससी परिक्षेची पूर्वतयारी करणा-या विद्यार्थ्यांशी
संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गाचा कार्यक्रम
शनिवारी (दि.5) सायंकाळी 5 ऐवजी दुपारी 4 वाजता सुरु होईल. याची सर्वांनी नोंद
घेऊन वेळेवर उपस्थित राहावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धा परिक्षेची पूर्वतयारी करणा-या युवक-युवतींसाठी
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने
दर महिण्याच्या 5 तारखेला शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात स्पर्धा परिक्षा
मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात स्पर्धा परिक्षेची
पूर्वतयारी, विषयाचे महत्व, मुद्यांची मांडणी, अभ्यासाचे पूर्वनियोजन आदी विषयावर
मार्गदर्शन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या बौध्दिक कौशल्यात भर पडण्यासाठी
सामान्य ज्ञान, प्रश्नोत्तरे व प्रश्नमंजुषाचा कार्यक्रमही घेतला जाणार असून
शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात नोकरीच्या उपलब्ध संधींची माहितीही यावेळी
सादरीकरणाद्वारे दिली जाणार आहे. त्याचा सर्वांनी लाभ घेऊन 5 ऐवजी 4 वाजता उपस्थित
राहावे, असे आवाहन महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाठलाग करुन यशाला गवसणी
माधव राचप्पा सुलफ़ुले हे मूळचे पांडुर्णी, ता. मुखेड
येथील रहिवासी असून त्यांनी नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी
महाविद्यालयातून टेक्सटाईल्स अभियंता ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळवल्यानंतर
2013 साली ते नाशिक येथे विक्रीकर निरिक्षक म्हणून रुजू झाले. तत्पुर्वी 2008
पासून ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करीत होते. 2011 साली ते
मुलाखतीपर्यंत पोहचले; परंतु निवडीची संधी मात्र हुकली. अपयशाने अजिबात खचून न
जाता यशाचा परिश्रमपूर्वक पाठलाग केल्यामुळे पाचव्या प्रयत्नात सुलफ़ुले यांनी
अखेर यशाला गाठून देशात 387 व्या क्रमांकाद्वारे आयएएस संवर्गात पात्र होण्याचा
मार्ग मोकळा केला. सुलफ़ुले यांनी मुखेड, नांदेड व अहमदपूर अशा ठिकाणी आपले शिक्षण
पूर्ण केले.
No comments:
Post a Comment